गेल्या वर्षभरापासून विजय जाधव (21) हा त्याच परिसरातील तरुणीचा पिच्छा पुरवत होता. अल्पवयीन मुलीच्या कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याने तिला पैशांचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीकही साधली. तिच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तिला वर्षभरापूर्वीच गावी गुलबर्गा (कर्नाटक) येथे पाठवले. महिन्यापूर्वीच ती ठाण्यात आली होती. पुन्हा तिला धमकावत लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. नंतर, गर्भपाताची औषधेही दिली. शनिवारी रात्री मात्र अचानक त्याने तिला लग्नाला नकार दिला.
या प्रकारातून आपली बदनामी होईल, या नैराश्येपोटी तिने रविवारी दुपारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनंतर मुलगा कुटुंबासह त्या परिसरातून बेपत्ता झाला आहे.
ते लक्षात येताच आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुलीचे नातेवाईक मोठय़ा प्रमाणात कापूरबावडी पोलीस ठाण्यात मोठय़ा प्रमाणात जमा झाले होते. आधी आरोपीला अटक करा, मगच अंत्यसंस्कारासाठी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्र त्यांनी घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी दिल्यानंतर सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.
आत्महत्या केलेली राजश्री ही घरातील सर्वात मोठी मुलगी आहे. त्यानंतर मालाश्री, बालभीम आणि गौतम ही भावंडे आहेत. रविवारी तिची आई घरकामासाठी बाहेर गेली होती, तर वडील सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला ऋतू पार्क येथे गेले होते. त्याच वेळी आपल्या लहान भावासमोरच तिने आत्महत्या केली.
** विजय जाधव हा राजश्रीला नेहमीच त्रस देत होता. तिला धमकावून भेटायला बोलवत असे. त्याची दहशत होती. तसेच त्याच्या आईने तो आता त्रस देणार नाही, अशी हमी काही दिवसांपूर्वीच घेतल्याने आम्ही पोलिसांत तक्रार केली नव्हती. त्याची दहशत आणि फसवणुकीमुळेच तिने आत्महत्या केली. त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.
– भरत कांबळे, राजश्रीचा भाऊ
*** या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपीला पोलीस लवकरच अटक करतील.
– सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, परिमंडळ 5