भेंड खुर्द येथे जलयुक्त शिवार योजनेतून सिमेंट बंधाऱ्याचे काम एप्रिल- मे २०१६ मध्ये करण्यात आले. पंडित आबा जंगले या शेतकऱ्याच्या शेतात हा बंधारा बांधण्यात आला होता; काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. २२ जून रोजी मोठ्या पावसात हा बंधारा फुटून दोन्ही बाजूंनी शेतात पाणी घुसून ६० शेतकऱ्यांच्या २०० एकर शेतीचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी सरपंच गोरख शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शेतकऱ्यांनी प्रतिगुंठा सहाशे रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जलसंधारण विभागाकडे करण्यात अाली; परंतु ही मदत देण्याएेवजी ३१० रुपयांप्रमाणे रक्कम चेकद्वारे देण्याचे विभागाने ठरवले. १६ जुलै २०१६ रोजी भेंडखुर्द येथे ४६ शेतकऱ्यांना १ लाख ८० रुपयांची मदत वाटप झाली. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अॅड. लक्ष्मण पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मदत वाटपाच्या कार्यक्रमात काही वेळाने आमदार पवार निघून जाताच उपअभियंता व्ही.एच. गर्जे यांनी सात शेतकऱ्यांना चलनात नसणाऱ्या नोटा वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना चेकने मदत दिली असता उपअभियंता गर्जे यांनी चेक स्वत:कडे घेऊन शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा दिल्या. अभियंत्याने या नोटा कोणत्या बँकेतून आणल्या हाही प्रश्न आहे. हा प्रकार उघडकीस येताच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.