दिपक देशमुख : घणसोलीकर
नवी मुंबई: ग्लोबल वॉर्मिंगवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘झाडे लावा झाडे जगवा’ची मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाच्या मोहिमेला फाटा देवून झाडांची भर दिवस कत्तल केला असल्याचा प्रकार ऐरोली विभागात घडला आहे. विशेष म्हणजे सदर प्रकाराकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाढत्या ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम निर्सगावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत असून वातावरणातील बदल राखून समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही राज्यभर दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करीत, सरकारने त्यातून एक अभियान देखील राबविले आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी अनेक कठोर कायदेही करण्यात आले आहेत. परंतु, त्यांची सर्रास पायमल्ली होताना दिसून येते. ऐरोली विभागात सेक्टर-५,६,१५ आणि १६ मध्ये रस्त्यांच्या तसेच सोसायटीच्या कंपाऊड अंतर्गत असलेली झांडाची भरदिवसा कत्तल केली जात आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेली सदरची वृक्षतोड रोखण्यासाठी महापालिकेने देखील कोणतेही कठोर पावले उचलेले नाही. त्यामुळे शासनाच्या ‘झाडे लावा झाडे जगवा’ मोहिमेला फाटा दिला गेल्याचा आरोप वृक्षप्रेमी नागरिकांकडून होऊ लागला आहे.