· ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’
· हेल्मेट सक्तीविरोधात पेट्रोल पंप चालक आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई : दुचाकीवरील वाढते अपघात रोखण्यासाठी चालकाकडे हेल्मेट असेल तरच त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळेल, असा आदेश परिवहन मंत्र्यांनी दिला. मात्र पेट्रोल न दिल्यास दुचाकी चालक आम्हालाच मारहाण करतील अशी भिती पेट्रोल पंप चालकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंप चालकावरही गुन्हा दाखल करण्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक मागे घ्यावे. या मागणीसाठी १ ऑगस्टपासून पेट्रोल कंपन्यांकडून पेट्रोलच खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल-डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. यात राज्यातील साडेचार हजार पेट्रोल पंप चालक सामिल होणार आहेत. गेल्या काही वर्षांत दुचाकी अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पेट्रोल पंप चालकांना देखील पहिल्यांदा हा निर्णय मान्य होता. मात्र शासनानकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात जर हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वराला पेट्राल पंप चालकाने पेट्रोल दिल्यास त्याच्यावरच गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात येईल, असा देखील उल्लेख केलेला आहे. त्यामुळे संतापलेल्या पेट्रोल पंप चालकांनी शासनाच्या या परिपत्रकावर आक्षेप घेत शासनाने तो तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत परिवहन विभाग आणि पेट्रोल पंप चालकांची बैठक देखील झाली. मात्र यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या जीआर विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल आणि डिझेल आसोसिएशनने दिला आहे. हेल्मेटला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र पेट्रोल न दिल्यास आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि आमच्या मालमत्तेचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. या उलट पेट्रोल दिल्यास आम्हालाच गुन्हेगार ठरवून आमच्यावर कारवाई होउ शकते. त्यामुळे शासनाने हा निर्णयच मागे घ्यावा अशी मागणी यावेळी फेडरेशनचे मुंबई अध्यक्ष रवि शिंदे यांनी केली आहे.
या अपघातामधील मृतांमध्ये हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे दुचाकीस्वार आणि त्यासोबत असलेल्या सहकाऱ्याला हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी हेल्मेट न घालताच दुचाकी चालवण्यात येतात. याला आळा घालण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वराला पेट्रोल पंपावर पेट्रोलच मिळणार नाही, असा कायदा काढला आणि त्याची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. रावते यांच्या या निर्णयाचे सर्वांकडूनच स्वागत करण्यात आले.
नियम लादण्याचा प्रयत्न
आम्ही पेट्रोल पंपावर हेल्मेट देखील विक्रीसाठी ठेवणार आहोत. मात्र दुचाकी चालकाकडे हेल्मेट नसेल तर त्याच्यावर कारवाई करणे वाहतूक पोलिसांचे काम आहे. शासन ही जवाबदारी आमच्यावर टाकून आम्हाला अडचणीत टाकत आहे. आम्ही पेट्रोल दिल्यास आम्ही गुन्हा करण्यास त्या चालकाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन आम्हाला अटक होणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी पेट्रोल पंप चालकांनी केली आहे.