- मुंबई :- राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान असा पहिला धडक मोर्चा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने काढल्याचा दावा केला आहे. बुधवारी काढलेल्या मोर्चाचे रूपांतर आजाद मैदानात जाहीर सभेत झाले. या वेळी अॅड. सुरेश माने यांनी सरकारवर टीका करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
माने म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. मात्र, ते आश्वासन पूर्ण करण्याऐवजी सरकार कारणे देत आहे. छोट्या राज्याच्या रूपात विदर्भाचा विकास व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. विदर्भ मागासलेला आहे, म्हणून विकासाचा अनेक क्षेत्रांत अनुशेष बाकी आहे. मात्र, मराठवाडा तर अति मागासलेला असून, रोजगार नियोजन, जलव्यवस्थापन, उद्योग व वीज, रस्ते, शेतीपंप अशा विविध सुविधांपासून मराठवाड्यातील लोक वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाप्रमाणे लवकरच स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होण्यासाठी मराठवाडा आर्थिक विकास कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली.
मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी माने यांनी केली. तसे शक्य नसल्यास १५ लाख रुपयांपर्यंतचे सामान्य नागरिकांचे कर्ज माफ करा, असेही ते म्हणाले. याशिवाय सच्चर समिती, प्रा. कुंडू समिती, रहेमान समिती आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
…………………
या मोर्चात धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष समशेर खान पठाण, निवृत्ती ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. तरी सोमवारी संगणक परिचालकांनी सीएसटी येथे केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे, राणीबाग येथून मोर्चा काढण्यास आयोजकांना पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे भायखळा पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयोजकांसोबत चर्चा करत मोर्चा काढण्यास परवानगी दिली.