नवी मुंबई : खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या सायन पनवेल महामार्गाबाबत नवी मुंबई मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. येत्या सात दिवसांत जर सायन पनवेल महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नाही तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील आसन व्यवस्थेसाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सर्व खुर्च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते निषेध म्हणून पळवून नेतील असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंते सतीश ओल्गार यांना आज निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात हजर होते. सायन पनवेल महामार्गालगतच असणाऱ्या या कार्यालयाचा परिसर मनसैनिकांनी घोषणा देऊन दणाणून सोडला.
सायन पनवेल राज्य महामार्गाची सध्याची दुर्दशा ही रस्त्यात खड्डे कि खड्ड्यांमध्ये रस्ता इतकी वाईट झालेली आहे. दरवर्षी करोडो रुपयांची कंत्राटे देऊन सुद्धा रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होते व त्यावर काहीच ठोस कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात नाही. सध्याच्या घडीला दोन चाकी वाहने व छोट्या वाहनांना सायन पनवेल महामार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला असून, या पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल असा आरोप शहर सचिव अॅड.कौस्तुभ मोरे यांनी केला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता तर वाढलीच आहे पण लोकांचा मौल्यवान वेळ देखील या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाया जात आहे. अवजड वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे जवळपास पाच पाच फुटांचे खड्डे सायन पनवेल महामार्गावर पडले आहेत. त्यात भर पावसामुळे हे खड्डे जलमय झाले असून, त्यामुळे छोटी वाहने व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गाची झालेली हि सर्व दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यांदेखत होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्मपणे सर्व परिस्तिथी जैसे थे ठेवत आहे व ही अत्यंत शरमेची व खेदाची बाब असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यावेळी म्हटले. कंत्राटदाराचे हीत जपण्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाला जास्त रस असल्याचा आरोप मनसे रोजगार विभागाचे शहर सचिव आप्पासाहेब कोठुळे यांनी केला आहे.
यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, शहर सचिव अॅड.कौस्तुभ मोरे, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रित तुर्मेकर, निखील गावडे, रोजगार विभागाचे नितीन चव्हाण, आप्पासाहेब कोठुळे, महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ, अनिता नायडू तसेच विभाग अध्यक्ष विक्रांत मालुसरे, प्रेमराज जाधव, विलास घोणे, नितीन नाईक, सागर नाईकरे, भूषण बारवे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.