मुंबईतील वरळी, लालबाग लोअर परेल, दादर, माटुंगामध्ये पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली येथेही पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय विक्रोळी, घाटकोपर, पवई, भांडुप, ठाणे, डोंबिवलीमध्ये पाऊस सुरु आहे. तसंच नवी मुंबईतील वाशी, पनवेलमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.
मध्यरात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. मुंबईत माटुंगा, हिंदमाता यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. पाणी साचलं असल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास ऐन कामाच्या वेळी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. वांद्रे-वरळी सी लिंकवर मुसळधार पावसाने वाहनांचा वेग मंदावला आहे.
रेल्वे, रस्ते, विमान सेवेवर परिणाम
पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर मुंबईकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बोरीवली ते वांद्रेदरम्यान तर ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर सायनपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे विमानं उड्डाणंही रखडली आहेत. कमी दृश्यमानतेमुळे विमानं 15 ते 20 मिनिटं उशिरा उड्डाण करत आहेत.