ठाणे : दोन हजार कोटींच्या एफेड्रीन प्रकरणी फरार असलेली सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णीसह विकी गोस्वामी, किशोरसिंग राठोड आणि सुशील अशीकनन यांच्या मुंबई,गुजरातसह इतर ठिकाणांवरील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. यासाठी ठाणे पोलिसांनी हालचाली सुरु केल्या असून ममता कुलकर्णीसह फरार आरोपींच्या सर्व मालमत्ता शोधून काढण्यास सुरूवात केली आहे.
या मालमत्तेचे विवरण लवकरच न्यायालयासमोर सादर केले जाणार असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांनी दिली.
९० च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीचे व विकी गोस्वामींचे तीन फ्लॅट मुंबईतील वर्सोवा येथे आहेत. या फ्लॅटसह ममता व विकीच्या गुजरात राज्यात असलेल्या मालमत्तेचा शोध पोलीस घेत आहेत, तर किशोरसिंग राठोड याची देखील गुजरातमध्ये मोठी मालमत्ता आहे. या फरार असलेल्या चारही आरोपींच्या मालमत्तेचे संपूर्ण विवरण ठाणे पोलीस न्यायालयात सादर करणार असून त्यानंतर न्यायालयातून या आरोपींच्या नावाने त्यांना हजर होण्यासाठी आदेश काढण्यात येणार आहे.
दरम्यान ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी, गुजरातमधील माजी आमदारांचा मुलगा किशोरसिंग राठोड आणि सुशील अशीकनन यांना ठाणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. या चौघांपैकी सुशील अशीकनन सोडला तर अन्य तिन्ही आरोपी भारताबाहेर असल्याने ठाणे पोलिसांनी आता त्यांच्या भारतातील मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.