नवी मुंबई : युवा आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा होतो. हा दिवस म्हणजे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो. आ.नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरभर करण्यात येते. मात्र स्वतः आमदार नाईक हे वाढदिवसाला उत्सवी स्वरुप देवू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करतात. या वर्षी देखील वाढदिवशी ते पुष्पगुच्छ अथवा कोणतीही भेटवस्तू स्विकारणार नाहीत.
आमदार नाईक यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंऐवजी आपल्या प्रभागांमध्ये विधायक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छाच आपल्यासाठी सर्वोच्चस्थानी असल्याचे आमदार नाईक यांनी म्हटले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी अवर्षणग्रस्त बांधवांप्रती संवेदना जपत आमदार नाईक यांनी साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. वाढदिवशी आमदार नाईक यांना प्रत्यक्ष भेटून सदिच्छा व्यक्त करण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि नागरिक येत असतात. त्याचप्रमाणे बॅनर आणि होर्डिंग लावून आपला स्नेह व्यक्त करणारे देखील अनेक आहेत. लोकोपयोगी तसेच सामाजिक कार्यक्रमांचे बॅनर आणि होर्डिंग लावताना शहर विद्रुपीकरण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पालिकेची रितसर परवानगी घेवूनच असे बॅनर आणि होर्डिंग लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.