सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई ः घणसोली गावातील एका सोनाराकडे कामास असलेल्या विक्रम प्रजापती (वय-२५) या तरुणाने सोनाराचे १२ लाख रूपये किंमतीचे ४७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार श्रावण गुज्जर (वय-२६) आणि आरोपी विक्रम प्रजापती दोघेही मुळचे राजस्थानमधील असून दोघेही एकाच गावातील आहेत.
श्रावण गुज्जर घणसोली येथील घरातूनच दागिने तयार करण्याचे काम करत होता. वर्षभरापुर्वी श्रावण गुज्जर याने आपल्या गावातील विक्रम प्रजापती याला घणसोली येथे आणून त्याला दागिने बनविण्याच्या कामाला लावले होते. मात्र, गत फेब्रुवारी महिन्यात श्रावण गुज्जर याचे वडील आजारी असल्याने तो राजस्थान येथे गेला होता. वडीलांची तब्येत जास्त बिघडल्याने श्रावण तेथेच थांबला. याच दरम्यान त्याने घणसोली येथील दागिने बनविण्याचा व्यवसाय आपला सहकारी विक्रम प्रजापती याच्यावर सोपविला होता.
श्रावण याच्या वडीलांचे जून महिन्यात निधन झाल्यानंतर त्याने घणसोली येथे येण्याची तयारी सुरू केली. याबाबतची माहिती देखील त्याने विक्रम याला फोनवरून दिली होती. मात्र विक्रम याने श्रावण घणसोली येथे येण्या अगोदरच त्याच्या घरात असलेले तब्बल १२ लाख रूपये किंमतीचे दागिने आणि सोन्याच्या लगडी घेऊन पलायन केले. २० जुलै रोजी श्रावण राज्यस्थान येथून घणसोलीमध्ये परतल्यानंतर विक्रम प्रजापती तेथुन पळुन गेल्याचे तसेच त्याने घरातील दागिने देखील चोरून नेल्याचे आढळुन आले. त्यानंतर त्याने विक्रम याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, श्रावण याला विक्रम याचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्याने रबाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विक्रम प्रजापती याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.