वेरुळला २००६ मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी आणि २६/११ मधील सूत्रधार अबु जुंदालसह ११ जणांना दोषी ठरविले आहे. तत्कालिन एटीएस प्रमुख के. पी. रघुवंशी यांना माहिती मिळाली होती की, नाशिक-मनमाड रस्त्यावर शस्त्रसाठ्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यानंतर एटीएसचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध भागात रवाना झाले. दरम्यान, औरंगाबादजवळ ८ मे २००८ रोजी टाटा सुमो व इंडिका या दोन गाड्या पथकाला दिसल्या. या गाड्यांचा पाठलाग सुरू असताना, आरोपींनी टाटा सुमो तेथेच सोडून इंडिकामध्ये बसून पळ काढला. शस्त्रसाठ्याची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक गाडी अबु चालवत होता.
यावेळी एटीएस पथकाने तीन संशयितांना अटक करुन तीस किलो आरडीक्स, १० एके-४७ आणि ३२०० बुलेट जप्त केल्या होत्या. त्यावेळी इंडिका गाडी जुंदाल चालवत होता. पोलिसांना चकवून तेथून निसटण्यात तो यशस्वी ठरला. अबु जुंदाल मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील असून तो आधी मालेगावला गेला. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेल्या जुंदाल माळेगावला गाडी घेऊन गेला आणि तिथे त्याने एका परिचिताच्या ताब्यात गाडी दिली. त्यानंतर काही दिवसांनी खोट्या पासपोर्टवर तो बांग्लादेशात पळून गेला. या प्रकरणात २२ लोकांना अटक करण्यात आली होती. यापैकी ११ जणांना दोषी ठरविण्यात आले. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबु जुंदाल मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. तो पुढे पाकिस्तानला गेला. जुंदाल वगळता या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. २०१२ मध्ये सौदी अरेबियावरुन त्याला भारतात आणण्यात आले.