रबाले एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई ः पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह कल्याण-शिळफाटा रस्त्यालगतच्या नाल्यात टाकून पळून गेलेला तिचा पती काझीम शेख (वय-३५) याला बिहार राज्यातून अटक करण्यात रबाळे एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. काझीम शेख याने मालमत्तेच्या वादातून पत्नी फरझाना शेख हिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील मृत फरझाना शेख कल्याण-शिळफाटा येथील देसाई गावात राहण्यास होती. तर तिचा हत्या करणारा दुसरा पती काझीम शेख महापे येथे राहतो. फरझाना हिच्या नावे तिच्या मूळ गावी जमीन असल्याने सदरची जमीन विकून त्यातील वाटा फरझाना हिने आपल्याला द्यावा यासाठी काझीम शेख प्रयत्न करीत होता. मात्र, फरझाना हिने काझीम शेख याला जमीन विकण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे या दोघा पती-पत्नीमध्ये वाद होऊन भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही काही महिन्यांपासून विभक्त रहात होते. २६ जुलै २०१६ रोजी काझीम याने पत्नी फरझाना हिला शिळफाटा येथे बोलावून घेतले होते. यावेळी देखील या दोघांमध्ये गावातील जमिनीवरुन वाद झाला. या वादातून काझीम याने फरझाना हिच्या डोक्यामध्ये जड आणि बोथट हत्याराने हल्ला करुन तिची हत्या केली. त्यानंतर काझीम याने फरझाना हिचा मृतदेह कल्याण-शिळफाटा रस्त्यावर पाईपलाईन लगत असलेल्या नाल्यात टाकून आपल्या मूळ गावी पोबारा केला होता.
दरम्यान, २८ जुलै रोजी फरझाना हिचा मृतदेह रबाळे एमआयडीसी पोलिसांना सापडल्यानंतर पोलिसांनी फरझाना हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यात फरझाना हिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ‘रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कैलाश कोडग आणि त्यांच्या पथकाने या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला असता फरझाना हिचा दुसरा पती काझीम शेख याने मालमत्तेच्या वादातून तिची हत्या केली असावी अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी फरार काझीम शेख याचा शोध घेतला असता तो बिहार येथील मूळ गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी काझीम शेख याची माहिती बिहार पोलिसांना दिल्यानंतर बिहार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी काझीम शेख याला अटक केली. न्यायालयाने काझीम शेख याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.