ठाणे- शेतमालाप्रमाणेच गाय आणि म्हशीचे दूधही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे प्रति लिटर दुधामागे १० ते १५ रुपये वाचतील, अशी माहिती राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी ठाण्यात दिली.
संस्कार संस्था आणि पणन मंडळातर्फे भरवलेल्या ‘संत सावता माळी आठवडी बाजार’ या राज्यातील पहिल्या शेतकरी आठवडी बाजाराचे शनिवारी येथील गावदेवी मैदानात उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी त्यांचा हा निर्धार व्यक्त केला.
सध्या गाईच्या दुधाचे प्रति लिटर ४५ रुपये, तर म्हशीचे दूध प्रति लिटर ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यात डेअरीवाले कमवून गब्बर होत आहेत.
त्यामुळे हे दूध थेट शेतक-यांकडून ग्राहकांना मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यात शेतक-यांचाही फायदा आहे. यामुळे दुधाचे दर सुमारे १५ ते २० रुपये स्वस्त होतील, असे सदाभाऊ खोत म्हणाले.