आमदार नरेंद्र पवारांचे एम. एस. आर. डी. सी च्या कार्यकारी अभियंतांना खरमरीत पत्र
कल्याण – शीळ रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार आक्रमक
कल्याण : इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यापासून कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला खड्डेमय रस्ता, वाहतूक कोंडीचा नित्याचाच पाहुणचार मिळतो. त्याचप्रमाणे याच कल्याण – शीळ रस्त्यावरील बहुतांशी भागात दुभाजक मोडकळीस आले असून रस्त्यालगत असलेल्या बंधिस्त गटारींवरील झाकणे चोरीला गेली आहेत. यामुळे नित्यनेच अपघात घडत आहेत. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील एम. एस. आर. डी. सीच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्यामुळे भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकारी अभियंता दत्तात्रय भोंडे खरमरीत पत्र देऊन नाकर्तेपणा बद्दल थेट तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या पत्रामुळे एम. एस. आर. डी. सी प्रशासन खडबडीत जागे झाले असून त्यांनी तात्काळ रस्त्यावरील दुभाजक लावण्याचे काम सुरु झाले आहे.
कल्याण शहराच्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उत्तम उपाय ठरणाऱ्या गोविंदवाडी बायपासचे काम मार्गी लावण्यासाठी आमदार पवार यांनी वेळ प्रसंगी शासन दरबारी आवाज उठवला. या गोविंदवाडी बायपासच्या बांधणीचे काम करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण – शीळ रस्त्यावरील सुमारे ४ किलोमीटर आपल्या हद्दीतील रस्ता एम. एस. आर. डी. सीकडे वर्ग केला आहे. या रस्त्यावरील जाहिरात आणि इतर उत्पन्न एम. एस. आर. डी. सीला मिळत असून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम देखील त्यांच्याकडे आहे. यामाध्यमातून कल्याण दुर्गाडी चौक, लाल चौकी, बैलबाजार चौक, पत्री पूल परिसरात पावसाळा पूर्वी पासून खड्डेच खड्डे आहेत. रस्त्यांवरील खड्यांमुळे पादचाऱ्याना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना नित्याचाच झाला आहे. यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यालगत असणाऱ्या बंदिस्त गटारी या उघड्या पडल्या आहेत. गटारांवरील झाकणे देखील गायब झाल्याने मोठे अपघात घडत आहेत. याबाबत सूचना देऊन देखील या सूचनांचे पालन करून कार्यवाही न केल्यामुळे नागरिकांच्या हिताचे एम. एस. आर. डी. सीला सोयरे सुतक नसल्याचा आरोप आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या निवेदनातून केला आहे.
दरम्यान नागरिकांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी वेळ पडल्यास आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्याची क्षमता माझ्यात आहे असे खडे बोल सुनवत आपला नाकर्तेपणा पाहून आपल्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आमदार पवार यांनी एम. एस. आर. डी. सीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या आक्रमक पत्रामुळे एम. एस. आर. डी. सी प्रशासन पुरते हादरले असून त्यांनी या मार्गावरील लालचौकी येथून लोखंडी दुभाजक लावण्याचे काम सुरु केले आहे.