** गावठाणात मिळणार आता चार एफएसआय
मुंबई : भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या मंत्रालयीन पातळीवर सुरू असलेल्या अथक पाठपुराव्यामुळे नवी मुंबईकरांच्या बाबतीत भाजपा-शिवसेना सरकार सातत्याने नवी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई आणि सिडकोच्या परिसरात प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि गावठाणापासून २०० मीटरच्या परिसरात बांधलेल्या घरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटकरिता ४ चटई निर्देशांक (एफएसआय) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला.
या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांत अनियमित बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते आणि इतर नागरी सुविधांसाठी मोकळी जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेक घरांपर्यंत वाहने, अग्निशमन गाड्या जाण्यात अडचणी येत होत्या. नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी सिडकोने तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याकरता मंदा म्हात्रे आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत होत्या. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे जवळपास चार हजार मीटर क्षेत्रफळाचा परिसर एकत्र करून त्या ठिकाणी बहुमजली इमारती उभ्या करायच्या. हे करताना ४ एफएसआय मिळणार असल्यामुळे इमारती उभ्या राहतानाच रुंद रस्त्यांसह, पाणीपुरवठा, मलनि:सारणाची व्यवस्था नियोजनबद्धरीत्या करता येणार आहे.
** २० हजार बांधकामांना लाभ…
नवी मुंबई आणि सिडको परिसरातील जवळपास ९५ गावांमधील २० हजार बांधकामांना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यातील १४ हजार बांधकामे ही महापालिका क्षेत्रातील तर ६ हजार बांधकामे ही सिडकोच्या क्षेत्रातील आहेत.
क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये नागरी सुविधांच्या आड येणारी काही बांधकामे पाडावी लागतील. मात्र, त्यांना अन्यत्र जागा मिळेल आणि ४ एफएसआयचा फायदादेखील मिळणार आहे.