इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंतांचे आयुक्तांना साकडे
वाशीतील हिरानंदानी रूग्णालयाची किडनी रॅकेटबाबत चौकशीची मागणी
नवी मुंबई : किडनी रॅकेट प्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चॅटर्जी यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही किडनी रॅकेट झाली असल्याची भीती व्यक्त करत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे हिरानंदानी रूग्णालयासोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची लेखी मागणी़ केली आहे.
हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यासह पाच डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चॅटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ. अनुराग नाईक, डॉ. मुकेश शेटे, डॉ. मुकेश शाह, डॉ. प्रकाश शेट्टी यांना पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. अधिक माहितीनुसार, या रुग्णालयात किडनी रॅकेट असल्याचे गेल्या महिन्यात उघडकीस आले होते. याची दखल घेत सरकारने चौकशीसाठी विशेष पथक स्थापित केले होते. या चौकशीत हिरानंदानी रुग्णालयाचे पाच डॉक्टरला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे उभ्या महाराष्ट्रात तर खळबळ उडालेलीच आहेच, पण नवी मुंबईकरांच्या अंगावरही भीतीचे शहारे उमटत आहेत. नवी मुंबईतील धनाढ्यांपासून ते पालिका कोट्यातून गोरगरीबांनी नवी मुंबईतील पालिका रूग्णालयाच्या जागेवरील हिरानंदानी रूग्णालयात उपचार घेतले असल्याने या ठिकाणीदेखील किडनी घोटाळा झाला असल्याची भीती आज नवी मुंबईकरांमध्ये चर्चेतून व्यक्त केली जात असल्याचे सावंत यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
किडनी प्रकरणात हिरानंदानी रूग्णालयाचा सहभाग पाहता नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांच्या हिताचा विचार करता हिरानंदानी रूग्णालयासोबत झालेला करार तातडीने रद्द करणे आवश्यक आहे. किडनी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चॅटर्जी यांनीच महापालिका प्रशासनासोबत झालेल्या करारावर स्वाक्षर्या केलेल्या आहेत. त्यामुळे या महाभयावह कृत्य करणार्या माणसांच्या अधिपत्याखाली अशी काळी कृत्ये नवी मुंबईतील मनपा रूग्णालयाच्या जागेवर सुरू असलेल्या हिरानंदानी रूग्णालयात केली असण्याची कुजबुज आज सर्वत्र सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात खळबळ उडविलेल्या या किडनी रॅकेटमध्ये हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चॅटर्जी यांचा सहभाग असल्याने अशा हॉस्पिटलबरोबर करार कायम ठेवून नवी मुंबईकरांच्या जिविताशी आपण अजून किती काळ खेळायचे यावर विचारमंथन करून तात्काळ योग्य निर्णय घेण्याची वेळ आज आलेली आहे. नवी मुंबई मनपा रूग्णालयच्या जागेत चालविण्यात येणार्या हिरानंदानी रूग्णालयातही असा काही प्रकार घडला आहे का, याचीही गंभीरपणे युध्दपातळीवर चौकशी करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबईतील आर्थिक दुर्बल घटकातील लोक नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हिरानंदानी रूग्णालयामध्ये महापालिका प्रशासनावर विश्वास असल्यानेच उपचार घेत असतात. त्यामुळे किडनी रॅकेट चालविणार्यांनी या गोरगरीबांच्या जिविताशी असा खेळ खेळला असल्याचा संशय आता निर्माण झाल्याने करार रद्द करण्याची मागणी आता सर्वसामान्य नवी मुंबईकरांकडून केली जात असून ही मागणी आम्ही आपणाकडे पोहोचविण्याचे काम करत आहोत. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास महापालिका प्रशासन सक्षम असल्याने अशा किडनी रॅकेटवाल्यांच्या ताब्यात नवी मुंबईकरांचे आरोग्य कितपत सुरक्षित राहील याचाही महापालिका प्रशासनाने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. 26 जुन 2012 रोजी हिरानंदानी रूग्णालयाची नोंदणीही रद्द केली असून हिरानंदानी रूग्णालयावर बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट 2005 मधील कलम 7 नुसार ही कारवाई करण्यात आली होती. असे असतानाही आजही हे रूग्णालय चालविले जात असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या 15 लाखापेक्षा अधिक असतानाही केवळ 800 रूग्णांनाच हिरानंदानी रूग्णालयामध्ये महापालिकेच्या माध्यमातून उपचार केले जात असून महापालिकेने पाठविलेल्या रूग्णाला येथे तुच्छतेने वागणूक दिली जात आहे. त्यांना फाटलेल्या चादरी व बेडशीट पुरविल्या जात असल्याचा अनुभव मी स्वत: घेतलेला आहे. याबाबत मी वैद्यकीय अधिकार्यांकडे तोंडी तक्रारही केली होती. नवी मुंबईतही हिरानंदानी रूग्णालयाशी संबंधित अधिकार्यांकडून किडनी रॅकेट चालविले गेले नाही ना, याचीही आता चौकशी होणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले.
हिरानंदानी रूग्णालयाला पाठीशी घालणे म्हणजे किडनी रॅकेट चालविणार्यांना साथ देण्यासारखे असल्याने यामुळे केंद्र व राज्य शासन पातळीवर विविध पुरस्कार मिळविणार्या महापालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे. या सर्व बाबींचा आपण विचार करून नवी मुंबई महापालिका प्रशासन व हिरानंदानी रूग्णालयाशी झालेला करार तातडीने रद्द करणेबाबत आपण पुढाकार घ्यावा असे पालिका आयुक्त मुंढे यांना सावंत यांनी साकडे घातले आहे.