शिवसेना नगरसेवक एम.के.मढवींची आक्रमक भूमिका
भाडेकरार वादाच्या भोवर्यात; करार रद्द करण्याची मागणी
नवी मुंबई : किडनी रॅकेट प्रकरणात मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाच्या कार्यकारी अधिकार्यासह पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांच्या अटकेचे पडसाद नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. महापालिकेने हिरानंदानी हेल्थ केअर सोबत केलेला रुग्णालय चालविण्याचा करारच रद्द करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.
मुंबईत पवई येथे असलेल्या हिरानंदानी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर, हिरानंदानी हेल्थ केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित चॅटर्जीसह अन्य चार डॉक्टरांना मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नवी मुंबई महापालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील निम्मा भाग मे. हिरानंदानी हेल्थ केअरला सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासाठी नाममात्र भाडेतत्वावर दिला आहे.
हिरानंदानी हेल्थ केअरने फोर्टीस हॉस्पिटल सोबत पोटभाडेकरु करार करुन, महापालिकेच्या जागेत सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु केले आहे. नवी मुंबई महापालिका आणि मे. हिरानंदानी हेल्थ केअर यांच्यात रुग्णालय सुरु करण्यासाठी केलेल्या भाडे करारात पोटभाडे करु नये असे स्पष्ट असताना, हिरानंदानी फोर्टीसला पोटभाडेकरु ठेवले आहे. महापालिकेचा करार हा हिरानंदानी सोबत असताना त्याठिकाणी फोर्टीस रुग्णालय कसे? याबाबत नगरसेवक आणि महापालिका प्रशासनात गेली अनेक वर्ष वाद सुरु आहे. त्यातच आता पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे हिरानंदानी हेल्थ केअरची संपूर्ण देशभरात नाचक्की झाली आहे.
किडनी रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी हेल्थ केअरचे कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित चॅटर्जी यांनी नवी मुंबई महापालिकेसोबत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्याच्या भाडेकरारावर मे. हिरानंदानी हेल्थकेअरच्या वतीने सह्या केल्या आहेत. संपूर्ण करार टाईप केलेला असतानाही त्यातील काही भाग खाडाखोड करुन त्या जागी पेनने लिहिलेले आहे. सदर करारावर डॉ. चॅटर्जी यांची सही आहे. परंतु, महापालिकेच्या महापालिकेचा हिरानंदानी सोबतचा करार रद्द करण्याची मागणी वतीने इतर कोणाही अधिकार्याची सही नाही. त्यामुळे सदरचा करार बोगस असून तो रद्द करण्याची मागणी शिवसेना सदस्य एम. के. मढवी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. यानंतर एम. के. मढवी यांच्या मागणीला स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मे. हिरानंदानी हेल्थ केअर सोबत केलेल्या कराराची कायदेशीर तपासणी करुन त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
एकंदरीतच पुन्हा एकदा महापालिका आणि हिरानंदानी यांच्यामधील सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासंदर्भातील जागा भाडेकरार वादाच्या भोवर्यात सापडला आहे.