या लोकलमध्ये दारू ढोसणाऱ्या युवकाचे नाव मोहित शेलार असून तो वांगणी परिसरात राहणारा आहे. दारूची झिंग चढल्याने तो इतर प्रवाशांना उर्मटपणे बोलत होता. जा कुणाला काय करायचे ते करा, मी कुणाला भीत नाही. रोजच मी येथे दारू पितो आणि पिणार, अशी उर्मटपणाची भाषा त्याला जाब विचारणाऱ्या प्रवाशांना हा तरुण करत होता. लोकलमधल्या ग्रुपच्या दादागिरीमुळे अनेकजण तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे असल्या मवाली लोकांचे फावते. मात्र त्याच लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका जागरूक प्रवाशाने या प्रकाराचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले.
विशेष म्हणजे लेडीज डब्याला लागूनच हा डबा होता. त्यामुळे दारू ढोसणाऱ्या तरूणाकडून आक्षेपार्ह घटना घडण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्य प्रवाशांनी त्याला हटकले. मात्र तर्राट झालेल्याने उलट प्रवाशांनाच दमदाटी केली. अखेर समयसूचकता दाखवून यातील एका प्रवाशांने याची व्हिडीओ क्लिप तयार करुन वायरल केली. या प्रकाराने मात्र एकूणच रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आता रेल्वे प्रशासन त्या दारूड्यावर काय कारवाई करते, याकडे सदर लोकलमधून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष लागून राहीले आहे.