‘ईटीसी केंद्रा’चा भोंगळ कारभार उघड
विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : : आमदार मंदाताई म्हात्रे यानी आज महापालिकेच्या वाशी येथील ईटीसी केंद्राला अचानक भेट देवून, सदर केंद्राचा पाहणी दौरा केला.
कर्णबधीर, मतीमंद आणि लर्निंग डीसीबिलीटी अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे केंद्र अशी ईटीसीची ओळख आहे. ह्या केंद्रावर दरवर्षी पालिकेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी खरच करण्यात येतो.तरीही, ह्या केंद्रात शिक्षण, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्षदर्शी अतिशय कमी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तर, पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या बांधकामांवर अनधिकृत ठरवून त्यांवर अतिक्रमणाचा हातोडा चालवणाऱ्या आयुक्तांनी ईटीसी केंद्राच्या इमारतीला अद्यापही ओ.सी.नसताना वापरासाठी परवानगी दिलीच कशी? असा सवालही आमदार म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. भोगवटा प्रमाणपत्र नसणे म्हणजेच सदर इमारत वापरासाठी सुरक्षित नसल्याचेही आमदार म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. पाहणी दौऱ्याप्रसंगी इमारतीमढील बहुतांश खोल्यांचे दिवे, पंखे विनाकारण चालू असल्याचे निदर्शनास आले.तसेच, इमारतीमधील काही खोल्यांमध्ये खाजगी संस्थांचे सामान विनापरवाना ठेवण्यात आल्याचेही आ. म्हात्रे यांच्या निदर्शनास आले.
केंद्रातील प्रयोगशाळा ह्या इमारतीच्या पडीक भागामध्ये स्थापित केल्या असून, त्यांचा वापर नक्की विद्यार्थ्यांना सबंधित विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी होतो कि नाही? असा प्रश्नही आमदार म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच, इमारतीच्या एका भागात पत्र्याचे शेड बेकायदेशीरपणे उभे असल्याचेही यावेळी समोर आले आहे. या केंद्रात शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी गणवेश व सह साहित्य यासाठी अर्थसंकल्पात वीस लाखांची तरतुद असतानाही, हि गणवेश अद्यापही भांडार विभागात पडीक असल्याचे आ. म्हात्रे यांच्या समोर आले आहे. तसेच, धोरण तयार ‘न’ करताच अर्थसंकल्पात अपंगक्षेत्र सक्षमीकरण करणे याबाबतची तरतूद करणे आणि ती गेल्या वर्षभरात खर्चच ‘न’ करणे यावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आक्षेप नोंदविला आहे. याविषयीची, तक्रार आपण नगरविकास खात्याकडे करणार असल्याचेही आमदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
तर, अपंगांचे समाजिक पुनर्वसन, सर्वेक्षण, क्षेत्रभेट व अतिथी खर्च यावर गेल्या वर्षात लाखो रुपयांची रक्कम खर्च करण्यात आल्यावरही आ. म्हात्रे यांनी शंका उपस्थित केली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ईटीसी केंद्रासाठी करण्यात आलेली तरतूद आणि त्या आवश्यकतेनुसार करण्यात आलेला खर्च यासाबंधीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर, विद्यमान संचालिका यांचे शिक्षण हे त्यांहून कनिष्ट असणारे शिक्षकांच्या शिक्षणापेक्षा कमी असल्याचेही यावेळी समोर आले आहे. तर, ह्या केंद्रातील सर्व विभागांचे मुख्याध्यापक प्रभारी असल्याचेही यावेळी समोर आले आहे. तर, कायमस्वरूपी संगीत शिक्षकांना काढून याठिकाणी कंत्राटी संगीत शिक्षण याठिकाणी आढळून आले. तर, पाहणी दौरा संपवून निघताना उपस्थित प्रभारी मुख्याध्यापकांनी चहासाठी विचारले असता, विद्यार्थ्यांचे पैसे विद्यार्थ्यासाठी खर्च करावा असा वडिलकीचा सल्ला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केला.