विद्या लोखंडे – गवई
नवी मुंबई : पनवेल, उरण तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना संगणक पुरविण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासन लवकरच आणणार आहे. ‘सिडको’ने यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थांना संगणकाची चांगली ओळख व्हावी आणि संगणक प्रणाली जाणणारी भावी पिढी घडावी यासाठी सिडको पुढाकार घेणार आहे. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी प्रकल्पग्रस्त असून शिवाय काही प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्थांचाही यात समावेश आहे.
नवी मुंबई शहर उभारणीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांशेजारील जमीन ‘सिडको’कडून संपादित करण्यात आलेली आहे. त्यातील ठाणे तालुक्यातील २९ गावे आणि सात उपनगरे नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पनवेल आणि उरण तालुक्यातील शिल्लक ६६ गावांचे उत्तरदायित्व आजही ‘सिडको’वर आहे. त्यामुळे सदर गावातील जिल्हा परिषदेच्या तसेच प्रकल्पग्रस्त संस्थांच्या शाळांना संगणकाची समस्या भेडसावत आहे. शिवाय आर्थिक परिस्थितीमुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप संगणकाची साधी ओळख देखील नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना संगणक ओळख तसेच त्याचे परिचलन लहानपणापासून व्हावे यासाठी ‘सिडको’ने पुढाकार घेत पनवेलउरणमधील शाळांना संगणक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.