दिपक देशमुख
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर रेल्वे फाटकाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील पुलावर गेल्या काही दिवसांपासून सकाळ-दुपार-संध्याकाळ बघ्यांची गर्दी हमखासपणे पहावयास मिळते. कोठे दंगल, हाणामारी नाही अथवा कोणत्याही सिनेमाचे चित्रीकरण पाहण्यासाठी ही गर्दी जमलेली नसते, तर नाल्यामध्ये अथवा नाल्याच्या किनारी पहूडलेली मगर पाहण्यासाठी ही गर्दी जमलेली असते.
गेल्या दहा-बारा दिवसापासून जुईनगर व सभोवतालच्या परिसरात जुईनगरच्या नाल्यात खुलेआम दर्शन होणार्या मगरीचीच चर्चा सर्वत्र आहे. मगर नाल्यात अथवा नाल्याच्या किनारी दिसत असतानाही महापालिका प्रशासनाने मगरीच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही हालचाली न केल्याबाबतचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
या पुलावरून ये-जा करणारे दुचाकीचालक, रिक्षाचालक अथवा पादचारी या ठिकाणी हमखास थांबून मगरीचे दर्शन घेतात अथवा मगर कोठे पहावयास मिळते का, याचा शोध घेताना पहावयास मिळतात. जुईनगर स्थानकातून बाहेर पडल्यावर सेक्टर 23-24 कडे येताना एक पायवाट आहे. या पायवाटीलगत मोठ्या प्रमाणावर गवत आहे. उद्या गवतात दबा धरून बसलेल्या मगरीने एकट्या जाणार्या पादचार्यावर हल्ला केल्यास दुर्घटना होण्याची भीती आहे. अशी दुर्घटना घडल्यावरच नाल्यातील मगरीचा बंदोबस्त करण्याकरता महापालिका प्रशासन पावले उचलणार का, असा संतप्त सवाल जुईनगरवासियांकडून विचारला जात आहे.