* खड्ड्यांचे “अच्छे दिन”
* रिक्षाचालकांना दमदाटी आणि शिवीगाळ ?
* संतप्त रिक्षाचालकांचे आरोप, बंदची हाक
कल्याण : रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांना डांबर कधी टाकणार असा प्रश्न खड्ड्यामुळे हैराण झालेल्या रिक्षाचालकांनी विचारल्यानंतर केडीएमसीच्या भाजपा नगरसेविका हेमलता पावशे यांच्या पतीने त्यांच्यावर दाबंगगिरी करीत दमदाटी केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी चिंचपाडा येथे घडला. रिक्षा चालकांवर केलेल्या दबंगगिरीमुळे संतप्त रिक्षाचालाकांनी बंदची हाक दिली. या अचानक झालेल्या बंदमुळे मात्र कल्याण पूर्वेतील प्रवाशांना नाहक त्रासाला समोर जावे लागले. रिक्षा अभावी नागरिकांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागली.
पूर्वेतील चिंचपाडा येथील रस्त्यांची दुरावस्ता झाली असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या खड्यांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरु असताना स्थानिक रिक्षा स्टॅण्ड प्रमुख सुनील मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह याठिकाणी जाऊन खड्यांमध्ये डांबर कधी टाकणार अशी संबंधिताना विचारणा केली. तेवढ्यात स्थानिक नगरसेविका हेमलता पावशे यांचे पती आपल्या कार्यकर्त्यांसह याठिकाणी धावून जात या रिक्षा चालकांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप सुनील मोरे यांनी केला आहे. या प्रकारा नंतर संतप्त रिक्षाचालकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढत महापालिका अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्त्यांबाबत जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे रिक्षाचालाकांनी आपला मोर्चा कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडे वळवत नगरसेविका हेमलता पावशे यांच्या पती विरोधात तक्रार केली. यावेळी संतापाचा पारा चढलेल्या रिक्षा चालकांची पोलिसांनी समजूत काढली. रिक्षाचालकांच्या या संतापाचा फटका मात्र कल्याण पूर्वेतील नागरिकांना बसला. यामुळे आपल्या कामासाठी प्रवास करण्यासाठी पायीच इच्छित स्थळ गाठावे लागले.