नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून आज ऐरोली, से.5 येथील चिंचोली उद्यानात सकाळी 6 पासून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात आयुक्तांशी सुसंवाद साधला.
’21 व्या शतकातील शहर’ असे नवी मुंबईला आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी शहराच्या योग्य नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत शहराचा विकास ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका नागरिकांच्या वतीने, नागरिकांसाठी काम करत असून महानगरपालिका पुरवित असलेल्या सुविधा अधिक चांगल्या स्वरूपात देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. याकरीता नागरिकांच्या सेवा सुविधांविषयांच्या अडी-अडचणी विभाग पातळीवरच दूर व्हाव्यात व त्यांना मुख्यालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यादृष्टीने विभाग कार्यालयांचे सक्षमीकरण केले असल्याचे ते म्हणाले.
‘वॉक विथ कमिशनर’ मध्ये प्राप्त निवेदनांवर कालमर्यादीत कार्यवाही होईल असे सांगत तत्पर कार्यवाही करावयाच्या बाबी 7 ते 15 दिवसात मार्गी लागतील आणि धोरणात्मक बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सध्या जागतिक मानकानुसार 135 लिटर प्रतिदिवशी प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करून दिले जात असून ते आपल्या सदस्यांना योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोसायट्यांची आहे. मात्र नागरिकांनी पाणी ही अनमोल संपत्ती आहे असा विचार करूनच आवश्यकतेपुरता पाण्याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
ऐरोली परिसराला पाणीपुरवठा करणा-या जलकुंभाचे काम प्रगतीपथावर असून जलकुंभ पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात पाण्याचा दाब योग्य प्रमाणात उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे या भागाला सध्या एमआयडीसीच्या पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा होत असून मोरबेची जलवाहिनी या भागात टाकण्याचे कामही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.
घनकचरा हा निर्मितीच्या ठिकाणीच ओला व सुका असा वेगवेगळा ठेवण्याची व तसाच महापालिकेच्या कचरा वाहनांकडे वेगळा देण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी आणि ही आपल्याच आरोग्यासाठी लाभदायक गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कचरा विल्हेवाटीचे व्यवस्थित नियोजन झाले तर आरोग्यावरचा खर्च आपोआप कमी होईल असे स्पष्ट करीत मागील तीन महिन्यात स्वच्छतेचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसत असले तरी यामध्ये अधिक सुधारणा केली जात असल्याचे सांगत याकामी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाणीपुरवठा, पार्कींग, फेरीवाले
सकाळी 6 पासून से.5 ऐरोली येथील चिंचोली उद्यानात नागरिक मोठ्या संख्येने आयुक्तांची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. नागरिकांमार्फत दिल्या जाणा-या निवेदनांवर आयुक्तांचे उत्तर ऐकून उपस्थित इतर नागरिक अनेकदा टाळ्या वाजवून पसंतीची दाद देत होते. तसेच यावेळी अनेक नागरिकांनी ‘तक्रार, सूचना काही नाही, फक्त आपल्याला भेटायचे होते’, असे म्हणत आयुक्तांशी हस्तांदोलन करीत त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचे अभिनंदन केले.