नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकापाणी पुरवठा विभागातर्फे तुर्भे परिसरात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने तुर्भे मधील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
डिसेंबर-२०१५ पासून महापालिकेने मोरबे धरणात पाणी कमी शिल्लक राहिल्याने नवी मुंबई शहरामध्ये करण्यात येणार्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात केली होती. त्याचा परिणाम तुर्भेकरांना एप्रिल महिन्यापासून खर्या अर्थाने जाणवू लागला. तुर्भे कॉलनी परिसरात पूर्वी तळ मजली चाळी होत्या. त्यानंतर गेल्या १० वर्षात येथे ३ ते ५ मजली मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे तुर्भे मधील लोकसंख्या वाढली असून, पाणी अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे पूर्वी २४ पाणी येणार्या ठिकाणी आता केवळ सकाळी दोन तास पाणी तेही पूर्वीपेक्षा कमी दाबाने येत असल्याने महिलांची गैरसोय होत आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपलब्ध पाणी साठ्यात नवी मुंबईमध्ये २४ तास पाणी देता येईल असे जाहीर केले आहे. त्यानुसार प्रती माणसी १३५ लीटर पाणी देण्याची कार्यवाही संपूर्ण नवी मुंबई शहरात अंमलात आणण्यात येत आहे. तुर्भे कॉलनीतही मीटरच्या अगोदर रेड्यूसर टाकण्यात आले.
त्यामुळे आधीच पाणी पुरवठा कमी दाबाने आणि वाढती लोकसंख्या असताना यात आणखी एका समस्येची भर म्हणून रेड्यूसर टाकल्याने पाणी अगदी बारीक धारेप्रमाणे येत आहे. यामुळे तुर्भे मधील रहिवाशी कमालीचे त्रासून गेले असून, महापालिका प्रशासन तुर्भे मधील नागरिकांच्या पाणी समस्येकडे ढूंकूनही पहात नसल्याने तुर्भेकरांमध्ये नाराजी पसरली आहे.