नवी मुंबई : 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाला अत्यंत हानीकारक असून त्यांचा वापर करणा-या विक्रेत्यांकडे असलेला प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करणे व त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्याची धडक मोहीम महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सर्वच महापालिका क्षेत्रात हाती घेण्यात आली आहे. यानुसार वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत से. 6, वाशी येथील विविध दुकानांमधील प्लास्टिक पिशव्यांचा साठा तपासण्यात आला. यामध्ये अन्सारी मिल्क सेंटर, पटेल ब्रदर्स, लक्ष्मीनारायण शॉप, गुप्ता फ्रुट अँड व्हेजीटेबल्स अशा चार दुकानांवर कारवाई करीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला व प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे घणसोली विभागाचे सहा.आयुक्त दिवाकर समेळ यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. यामध्ये घणसोली विभागातील से.1,7,9 याठिकाणच्या डी मार्ट, आईमाला सुपर मार्केट, गुप्ता सुपर मार्केट, बंगलोर अय्यंगार बेकरी या चार दुकानांवर कारवाई करीत प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकुण रु. 20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधक मोहीमा हाती घेण्यात आल्या असून व्यापारी / विक्रेत्यांनी पर्यावरणाला हानीकारक अशा 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आपल्या व्यवसाय ठिकाणी ठेवू नयेत तसेच नागरिकांनीही त्या वापरु नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.