‘आपण बोलता ते खरे कशावरून’ – मुंढेंचा मंदाताईंना सवाल
नवी मुंबई: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांना उद्भवणार्या समस्यांवरुन खडाजंगी झाली. गणेशोत्सव मंडळांना परवानगी, शहराच्या पाणी प्रश्न तसेच रिडेव्हलपमेंटच्या समस्येवर आयुक्त मुंढे यांच्याशी चर्चेसाठी गेलेल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ईटीसीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची आपण काय चौकशी केली असे विचारताच सदर विषयावर ‘तुम्ही बोलता ते खरे कशावरून’ असे बोलून आयुक्तांनी पुन्हा एकदा आपणास अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
नागरिकांचे प्रश्न घेऊन गेलेल्या आमदार म्हात्रे यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोघांमध्ये दुसर्यांदा शाब्दिक चकमक झडली. परिणामी महापालिकेत आयुक्त आणि आमदारांमध्ये झालेल्या ‘तू-तू मै-मै’मुळे दिवसभर चर्चेला ऊत आला होता. दरम्यान, या प्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपण मंदाताई म्हात्रे यांचा अवमान केला नसल्याचे पत्रकारांकडे स्पष्ट केले.
महापालिकेच्या ईटीसी केंद्रात भ्रष्टाचार आणि अनेक बाबतीत अनियमितता आढळून आल्याने आपण ईटीसीतील कारभाराची तसेच या केंद्राला मिळालेल्या गोल्ड पुरस्कारासह सीएसआर निधीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. ईटीसी संचालिका वर्षा भगत यांच्या पदाला शासन मान्यता नाही. तसेच महापालिकेच्या सीएसआर कमिटीच्या प्रमुखपदी केवळ अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती होऊ शकत असताना वर्षा भगत यांची नियुक्ती कशी करण्यात आली? असा प्रश्न आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ईटीसी केंद्राला सीएसआरद्वारे मिळणार्या निधीचे अद्यापपर्यंत काय केले. ज्या कंपन्यांनी सीएसआर निधी महापालिकेला दिला नाही, त्या
कंपन्यांवर काय कारवाई केली. ईटीसी केंद्राला भेट देणार्या पाहुण्यांवर २५ लाख खर्चाची करण्यात आलेली तरतूद तसेच येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणार एक राजगिर्याच्या लाडूची किंमत १५ रुपये कशी? असा प्रश्न उपस्थित करीत सदर सर्व बाबी अनाकलनीय आहेत. असे असताना आयुक्त केवळ ईटीसीवर इतकी मेहरबानी का दाखवत असल्याचे सांगत याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे
मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी आपण जनतेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांची भेट घेतली. गणपती मंडळांना स्वागत कमानी लावण्यासाठी परवानगी देणे, शहरात होणारा अपुरा पाणी पुरवठा आणि ईटीसीतील अनियमिततेची चौकशी करणे याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. मात्र, एकाही प्रश्नाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत. उलटपक्षी शिष्टमंडळासमोर त्यांनी लोकप्रतिनिधीचा अपमान केला. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.