नवी मुंबईः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमवर मार्बलचे आच्छादन रद्द करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाला आक्षेप घेत त्याबाबत लक्षवेधी मांडून प्रशासनाला धारेवर धरणार्या लोकप्रतिनिधींनी अखेरीस महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बॅकफुटवर आणले. आता पाणी प्रश्नावरून प्रशासनाला लक्ष्य केले आहे. मंगळवारी, २३ ऑगस्ट रोजी होणार्या तहकूब सभेमध्ये शहरात उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर लक्षवेधी उपस्थित करुन नगरसेवक आपल्या तीव्र भावना व्यक्त करुन प्रशासनाच्या पाणी वाटपाच्या धोरणावर टीकास्त्र सोडणार आहेत.
यंदा मुंबईसह राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांशी धरणे पाण्याने भरली आहेत. मात्र आजही नवी मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गत १९ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेपुढे पाणी प्रश्नावर लक्षवेधी असताना आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात उपस्थित न राहिल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. तर सत्ताधारी ‘राष्ट्रवादी कॉग्रेस’च्या सभा तहकुबीच्या निर्णयावर ‘शिवसेना-भाजप’ने सभागृहात राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
नवी मुंबई शहराची पाण्याची गरज पाहता कर्जत तालुक्यातील मोरबे धरण खरेदी करणारी नवी मुंबई महापालिका मुंबईनंतर राज्यातील पहिली महापालिका आहे. मोरबे धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता लक्षात घेता सभागृहाने २४ तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातील धोरणाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
गेल्या वर्षी राज्यात सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अन्य महापालिका आणि ग्रामीण भागाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असताना नवी मुंबई शहराला मात्र दोन वेळा पुरेसा पाणी पुरवठा सुरू होता. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची तुकाराम मुंढे यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सभागृहाचा पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील निर्णय रद्द करत (दर माणसी १६५ ते २०० लिटर ) दिवसाला फक्त १३५ लिटर पाणी प्रति व्यक्ती देण्याचे धोरण स्विकारले. आयुक्तांच्या सदर निर्णयामुळे गत तीन महिन्यांपासून नवी मुंबईकर जनतेची अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे ओरड सुरु आहे. बहुतांश नगरसेवकांना अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडून बहुतांश धरणे पाण्याने भरली असताना नवी मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण भटकावे लागत आहे. आजच्या घडीस दररोज ३०० एमएमलडी पाण्याचा जरी पुरवठा नवी मुंबई शहरासाठी प्रशासनाने केला तरी २० ऑगस्ट २०१७ पर्यंत या शहराला पाण्याचा पुरवठा सुरुळीत होऊ शकतो इतका पाण्याचा साठा मोरबे धरणात झालेला आहे. असे असताना भर पावसाळ्यात देखील पाण्यासाठी नागरिकांना टाहो फोडावा लागत आहे ही नवी मुंबईकर जनतेसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. अखेरीस पाणी प्रश्नावरुन जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’चे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांनी १९ ऑगस्ट रोजी झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत नवी मुंबईतील तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न लक्षवेधी सुचनेद्वारे मांडला होता. सदर लक्षवेधीवर सभागृहाच्या भावना लक्षात घेवून आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे मात्र सभेला गैरहजर राहिले. नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आयुक्तांना वेळ नसल्याने सभागृह नेते जयवंत सुतार यांच्यासह ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यावर महापौर सुधाकर सोनवणे यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय जाहिर करताच, शिवसेनेचे पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर आणि भाजपच्या सदस्यांनी महापौरांनी जाहिर केलेल्या निर्णयावर आक्षेप घेत यापूर्वी आयुक्तांच्या अनुपस्थितीत अनेक सभा झाल्याचे सांगितले. असे असताना सत्ताधारी ‘राष्ट्रवादी कँाग्रेस’ने बहुमतांच्या जोरांवर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, महापालिका सभागृहाने बहुमताने घेतलेले निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या अधिकारात बदलत आहेत. असे करून आयुक्त महापालिका सभागृहाचा अवमान करत आहेत. त्यामुळे सभागृहात पाण्याच्या प्रश्नावर सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी आयुक्तांची सभागृहात उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय बहुमताने घेतल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. एकंदरीतच मंगळवारी, २३ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील पाणी प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पेटणार असल्याचे बोलले जाते.