नवी मुंबई ः नेरुळ रेल्वे स्थानकालगत रेल्वे रुळाजवळ १७ सप्टेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाच्या पोटामध्ये मारहाण करुन त्याची
हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मृत तरुणाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मृत तरुण अंदाजे २५ वयोगटातील असून १७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृतदेह सीवुडस् कडून नेरुळच्या दिशेने जाणार्या रेल्वे रुळालगत नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला होता. नेरुळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सदर तरुणाच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नसल्याने पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्याचप्रमाणे मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मृत तरुणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यात मयत तरुणाच्या पोटामध्ये गंभीररित्या मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तींनी सदर तरुणाच्या पोटामध्ये गंभीरपणे मारहाण करुन त्याला जखमी अवस्थेत नेरुळ रेल्वे स्थानकातील रुळा लगत टाकून दिल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाच्या अंगात लाल रंगाचे फुल बाह्याचे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. त्याची उंची ५ फुट ५ इंच इतकी असून त्याचा बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या तळहाताच्या पाठीमागील बाजुस नाग आणि त्रिशुलचे चिन्ह गोंदले आहे. सदर तरुणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी नेरुळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नेरुळ पोलिसांकडून करण्यात आला आहे.