श्रीकांत पिंगळे
* इंटक लवकर राज्यव्यापी मूक मोर्चा काढणार
*इंटकच्या अधिवेशनात भाजपा सरकारवर टीका
नवी मुंबई : केंद्रामध्ये भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कामगार धोरणामध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळेच महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कामगार देशोधडीला लागले असल्याची खरमरीत टीका इंटकचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली.
नवी मुंबईतील वाशीमध्ये इंटकतर्फे रविवारी झालेल्या एकदिवसीय राज्यव्यापी अधिवेशनात छाजेड बोलत होते.
भाजपा सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात लवकरच इंटकतर्फे राज्यव्यापी मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा छाजेड यांनी यावेळी दिला.
कर्नाटक राज्याचे अन्न व पुरवठामंत्री यू.ट ी. खांदेर यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. या अधिवेशनास इंटकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र घरत, इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांच्यासह राज्यातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक इंटकचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
मुंबईतील आझाद मैदानात राज्य सरकारच्या विरोधात इंटकतर्फे राज्यव्यापी मूक मोर्चा काढण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातून सुमारे एक लाखाहून अधिक कामगार व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचा अंदाज छाजेड यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई कार्यक्षेत्रातील महापालिका, बाजार समिती, एमआयडीसीसह खासगी आस्थापनेतील कामगारांच्या समस्येचा आढावा घेत आपण केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली.
**
कामगार विरोधी धोरणाचा मोर्चातून निषेध करणार
कामगार क्षेत्रात केंद्र सरकारने बदललेल्या अन्यायकारक कायद्याचा अभ्यास न करता राज्य सरकारने थेट त्यांची अंमलबजावणी केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम कामगारांना भोगावे लागले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. इंटक या मूक मोर्चाद्वारे राज्य सरकारचा जाहिर निषेध करणार असल्याचे इंटकतर्फे सांगण्यात आले आहे.