नवी मुंबई : महापालिका प्रशासन आणि नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये दरी निर्माण व्हावी, पालिका प्रशासनाप्रती स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होवून ग्रामस्थांचा उद्रेक व्हावा की जेणेकरून पालिकेच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण व्हावा या हेतूने गेल्या आठवडाभरापासून सोशल मिडीयावर वेगवेगळी माहिती काही घटकांकडून जाणिवपूर्वक पसरवली जात आहे. याविरोधात महापालिका आता मैदानात उतरली असून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना खरी माहिती कळावी याकरता मनपा प्रशासनानेही मिडीया व सोशल मिडीयाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पग्रस्त नागरिकांना नोटीसेस देऊन त्यांची घरे तोडणार असल्याची माहिती व बातमी सध्या सोशल मिडीयावरून फिरत असून प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरविण्यात येत आहे. याबाबत वस्तुस्थिती सादर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जी अनधिकृत बांधकामे आहेत अशा बांधकामाबाबत वेळोवेळी मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशानुसार व शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना व तत्वानुसार निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका गांवठाण / विस्तारीत गांवठाणातील घरे नियमित करण्याच्या प्रस्तावात शासनाच्या विचाराधिन असलेल्या घरांवर कोणतीही कार्यवाही सध्या करणार नाही. महापालिकेमार्फत गावठाण व विस्तारीत गावठाणातील घरांना बांधकाम परवानगी देण्यास देखील सुरुवात केलेली असून याबाबत ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याची पध्दतदेखील सुरू केलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रितसर परवानगी घेऊनच घरांचे बांधकाम, दुरुस्तीची कामे करण्याची दक्षता घ्यावी. नवी मुंबई महानगरपालिका किंवा शासकीय जागेवर जी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, ज्यामध्ये रहिवास सुरू झालेला नाही व ज्यांना नोटिसेस देऊन देखील अद्याप बांधकामे थांबविलेली नाहीत अशाच अनधिकृत बांधकामावर मा.उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या महानगरपालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी बनावट कागदपत्रे सादर करुन काही विकासकांनी अनधिकृतरित्या बांधकामे सुरु केलेली आहेत, अशा बांधकामांवर प्राधान्याने निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गावठाणातील बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच याबाबत काही अधिक माहिती आवश्यक असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.