श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई: घणसोली गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक संजय (अंकल) पाटील (५२) यांचे ५ नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. शिवसेना नगरसेवक प्रशांत पाटील यांचे काका आणि नगरसेविका कमलताई पाटील यांचे ते दीर होत.
५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३च्या सुमारास संजय पाटील यांच्या पार्थिवावर महापालिकेच्या घणसोली येथील कौलआळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, दै. जनशक्तीचे वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील, भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, उपमहापौर अविनाश लाड, सभागृह नेते जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील, केशव म्हात्रे, शंकर मोरे, राजू शिंदे, शिवेसना शहरप्रमुख विजय माने, शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, बहाद्दूर बिस्ट, काशिनाथ पवार,माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, ठाणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, मनपा परिवहन सभापती मोहन म्हात्रे, भाजपा नगरसेवक सुनिल पाटील, पवार, समाजसेवक कृष्णा पाटील, मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे, सारसोळे येथील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर आदिंसह विविध पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मनमिळाऊ स्वभावामुळे संजय (अंकल) पाटील नवी मुंबईतील सर्वपक्षीय राजकीय लोकांमध्ये सुपरिचित होते.
घणसोली गावात सार्वजनिक नवरात्रोत्सव, क्रिकेट सामने आणि महिलांसाठी हळदीकुंकू असे तीन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने ते दरवर्षी नियमित करीत असत. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाच्या व्याधीने आजारी होते. ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचारादरम्यान ५ रोजी पहाटे ६ च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.