श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई :शहराच्या विकासात सर्वांचा सहभाग अपेक्षित असून ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी साधल्या जाणा-या संवादातून त्यांच्या तक्रारी, अडचणी समजून घेता येतात त्याचप्रमाणे त्यांच्या महापालिकेकडून असलेल्या अपेक्षा व शहर विकासाबाबतच्या त्यांच्या संकल्पना सूचना जाणून घेता येतात अशा शब्दात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सेक्टर 9, नेरुळ येथे ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाप्रसंगी सुसंवाद साधला. यावेळी मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी नागरी सेवा सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत, त्यामध्ये नागरिकांनीही शहराबाबतचे आपले दायित्व ओळखून सक्रीय योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी नागरिकांकडून करण्यात आलेल्या 105 सूचनांमध्ये मोठ्या प्रमाणावरील पार्कींगच्या सूचना लक्षात घेऊन आयुक्तांनी याबाबत महानगरपालिका सर्वच विभागांत पार्कींगचे नियोजन करीत असल्याची माहिती दिली. यामध्ये योग्य त्या ठिकाणी वन वे वाहतूक, सिंगल साईड पार्कींग, राखीव पार्कींग प्ल़ॉट अशा विविध प्रकारे नियोजन केले जात असून नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून योग्य त्याच ठिकाणी पार्कींग करणे, सोसायटीच्या आवारातील पार्कींग जागेचा वापर करणे, विशेष म्हणजे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्यंत साध्या साध्या गोष्टींमधून नागरिक म्हणून असलेली आपली जबाबदारी आपण पार पाडायला हवी असे सांगत आयुक्तांनी कचरा कुठेही न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अशा अनेक छोट्या गोष्टींमधून नागरिक सामाजिक जबाबदारी पार पाडू शकतात. उद्यानांमधील खेळण्यांचा तसेच सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे सांगत लवकरच महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांवर व उद्यानांमध्ये लहान लिटर बिन्स बसविल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ओला आणि सुका कचरा नागरिक पातळीवरच वर्गीकृत केला जाणे आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी पाण्याचा गरजेइतकाच वापर करावा, पाणी वाया घालवू नये तसेच 24 X 7 पाणीपुरवठ्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी ए.एम.आर. मिटर त्वरीत बसवून घ्यावेत असेही त्यांनी सांगितले.
शहर विकासामध्ये नागरिकांचे संपूर्ण योगदान अपेक्षित असून नागरिकांना जाणवणा-या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात यायला लागू नये. घरबसल्या त्यांना आपल्या अडचणी महापालिकेकडे मांडता याव्यात व त्याची माहितीही सहज उपलब्ध व्हावी यादृष्टीने ई-गव्हर्नन्स वर भर देत www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर कार्यान्वित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) चा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
यामध्ये नागरिकांना तक्रार कोणत्या विभागाशी संबंधीत आहे हे माहित नसले तरी ती तक्रार योग्य विभागाकडे पाठविण्याची व्यवस्था त्या संगणकीय प्रणालीत असून तक्रार दाखल केल्यानंतर नागरिकांना एक कोड नंबर इ-मेल / मोबाईल एस.एम.एस. व्दारे कळविला जातो. ती तक्रार संबंधित अधिका-याने मर्यादित कालावधीत न पाहिल्यास व त्यावर कार्यवाही न केल्यास ती त्यांच्या वरिष्ठ अधिका-याकडे पाठविली जाते. त्यामुळे तक्रारीवर विहित कालावधीत कार्यवाही करणे संबंधित अधिका-यांवर बंधनकारक आहे. तक्रारी बाबतच्या कार्यवाहीची माहिती संबंधित अधिका-यांनी नागरिकांना द्यावयाची आहे तसेच आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली हे नागरिक आपला कोड नंबर टाकूनही पाहू शकतात.
विशेष म्हणजे तक्रारीवरील कार्यवाहीचे मूल्यमापन करून नागरिक आपला गुणवत्ता अभिप्राय या प्रणालीत नोंदवू शकतात तसेच तक्रारीवरील कार्यवाहीने समाधान न झाल्यास पुन्हा तक्रार दाखल करण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध आहे अशी माहिती देत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी या प्रणालीचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून कोणत्याही महापालिका कार्यालयात न जाता आपल्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले.
सकाळी 6 वाजल्यापासून मोठ्या संख्येने नागरिक आयुक्तांना भेटण्यासाठी अत्यंत उत्साहाने उद्यानात उपस्थित होते. निवेदन देतानाही अनेकांनी आयुक्तांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करीत आपल्याकडून नवी मुंबईचा गतीमान विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.
आत्तापर्यंतच्या 17 ठिकाणी झालेल्या “वॉक विथ कमिशनर” उपक्रमांमध्ये प्राप्त 1245 निवेदनांपैकी 1083 निवेदनांवर कार्यवाही करण्यात आली असून उर्वरीत 162 निवेदनांवरील कार्यवाही प्रगतीपथावर आहे. नागरिकांच्या तक्रारी / सूचनांचे कालमर्यादीत निराकरण होत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.