नवी मुंबई: शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे पाडा; अन्यथा न्यायालयाच्या आदेश अवमान कारवाईला सामोरे जा, असा इशारा राज्य सरकारने दिल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा शहरातील सरकारी संस्थांकडून बेकायदा धार्मिक स्थळांची माहिती घेण्यास सुरूवात झाली असून शहरातील जवळपास ४०० धार्मिक स्थळे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या रडावर आली आहेत. यामुळे सरकारी जमिनीवर बेकायदा धार्मिक स्थळे बांधून जागा बळकावणार्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
राज्यातील शासकीय अथवा खाजगी जमिनींवर अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या सर्व धार्मिक स्थळे पाडण्यासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ नंतरची सर्व धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पाडण्याचे आदेश गृहखात्याला दिले आहेत. त्यानुसार नगरविकास खात्याने संबंधित महापालिका आणि जिल्हाधिकार्यांना कारवाईसाठी आदेश दिले. पण, संबंधितांनी कारवाई केली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नगरविकास खात्याने महापालिका आयुक्तांना बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्याबाबत पुर्नआदेश दिले आहेत. त्यानुसार आता नवी मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.
महापालिकेने आतापर्यंत २००९ नंतरची २२ बेकायदा धार्मिक स्थळे हटवली असून १५ धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई केला जाणार आहे. सिडकोनेराज्य शासनाच्या इशार्यानंतर महापालिका कारवाईसाठी सज्ज महापालिकेला त्यांच्या हद्दीतील २९७ बेकायदा धार्मिक स्थळांची यादी दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी, एमआयडीसी आणि वन विभागाकडून अद्याप त्यांच्या भूखंडांवरील बेकायदा धार्मिक स्थळांची माहिती मिळालेली नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिका हद्दीतील बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्यासाठी महापालिका, सिडको, जिल्हाधिकारी, एमआयडीसी आणि वन विभागाची समिती तयार करण्यात येणार आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्त असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करताच नवी मुंबईच्या गांवठाणातील पुरातन मंदिरे वाचवण्यासाठी मंदिर बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. जर पुरातन मंदिरे अडचणीची ठरत असल्यास त्यांना पर्यायी भूखंड देण्याची मागणी केली करणार असल्याचे हिंदू महासभेचे नवी मुंबई युवा प्रभारी मंगेश म्हात्रे यांनी सांगितले.