* विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने मैदानातून पळ काढला होता.
* मुंबईतील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असतानाच आम आदमी पक्षाने महापालिका निवडणूक लढवायची नाही असा निर्णयं घेतला आहे. आम आदमी (आप) पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे. आप ने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करत असलेल्या मुबईतील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागा लढवण्याची तयारी केली होती. 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षाच्या निवडणुकीचा नारळही फुटणार होता. मात्र आप ने यू टर्न घेतला आहे. फेब्रुवारी मध्ये पंजाब आणि गोवा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आप ने या दोन्ही राज्यात मोठ्या ताकदीने उतरायचे ठरवले आहे. त्यामुळे पक्षाचे स्टार नेते आणि बिनीचे कार्यकर्ते या दोन राज्यात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीस फारसा वेळ देता येणार नाही त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे सांगीतले जात आहे. मात्र आम आदमी पक्षातून फुटून नवा स्वराज्य पक्ष स्थापन झाल्याने आपचे मुंबईतील समाजवादी कार्यकर्त्यांची पांगापांग झाली आहे परिणामी मुंबईतील प्रीती मेनन, सतीश जैन, मयांक गांधी आदी दहाबारा नेत्याव्यतिरीक्त आपकडे कोणी बडे नेते नाहीत. मुंबईत पक्षाला काही जनाधारही नाही. तसेच पक्षाने मागच्या वर्षभरात मुंबईकरांसाठी काही विशेष कार्यक्रमही राबवलेले नाहीत, त्यामुळेच पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी मुंबई महापालिका निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. मागच्या लोकसभेच्या निवडणुका या पक्षाने राज्यात लढवल्या होत्या. त्यात पक्षाला विशेष यश मिळवता आले नाही . विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने मैदानातून पळ काढला होता. आता पालिका निवडणुकीचे ही मैदान सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.