नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने नेरुळ पामबीच मार्गालगत उभारलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटन स्थळाठिकाणी उभारलेल्या सुशोभित एलईडी फिटींगच्या २२५ विद्युत पोलपैकी ३५ विद्युत पोलची मोडतोड करणार्या अज्ञात इसम आणि सुरक्षारक्षकांविरोधात नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घडल्या प्रकाराबाबत नगरसेविका रूपाली भगत यांनी नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी जे गुन्हेगार असतील त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी उभारलेल्या सुशोभित एलईडी फिटींगच्या २२५ विद्युत पोलपैकी ३५ विद्युत पोलची १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री काही अज्ञात इसमांनी मोडतोड केल्याने त्यांच्या विरोधात नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये महापालिकातर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. विद्युत पोलची मोडतोड केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला
जाणार्या नागरिकांनी भ्रमणध्वनीवरुन बेलापूर विभाग अधिकारी यांना दिल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी कार्यरत सुरक्षा रक्षकांना विद्युत पोलची मोडतोड करणार्या अज्ञात इसमाविरुध्द नेरुळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली. तथापि या ठिकाणी ४ सुरक्षारक्षक रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत कार्यरत होते. त्यामुळे सुरक्षारक्षकांना पर्यटन स्थळावरील विद्युत पोलची मोडतोड झाल्याची माहिती असणे गरजेचे होते.
यावेळी कर्तव्यावर कार्यरत असणार्या ४ सुरक्षारक्षकांनी आपले कर्तव्य पार न पाडल्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेची आर्थिक हानी झाल्याचे लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका तर्फे बेलापूर विभाग अधिकारी यांनी विद्युत पोल्सची मोडतोड करणार्या अज्ञात इसमाविरुध्द तसेच त्यावेळी सुरक्षारक्षक बोर्ड, मुंबई या संस्थेमार्फत पर्यटनस्थळी मालमत्तेच्या संरक्षणाकरीता कार्यरत असणार्या रात्रपाळीतील ४ सुरक्षा रक्षकांविरुध्द कर्तव्यात कसूर केल्यामुळे सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ मधील कलम ३(२)(ए) अन्वये नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.