*पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करुनच घणसोली नोड हस्तांतरण करण्याची आमदार नाईक यांची मागणी
*आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : सिडकोच्या अख्यत्यारित असलेला घणसोली नोड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रीया प्रगतीपथावर असून याकामी आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करुनच हा नोड नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक भुषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
घणसोली नोडमध्ये सिडकोने पायाभूत आणि इतर नागरी सुविधांची कामे न केल्याने या नोडमधील रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिडकोमार्फत सुविधांची कामे या नोडमध्ये व्हावीत, यासाठी स्थानिक आमदार म्हणून आमदार संदीप नाईक हे सातत्याने प्रयत्नशील असून अविरत पाठपुरावा करीत आहेत. आज आमदार नाईक यांनी व्यवस्थापकीय-संचालक गगराणी यांची सिडको भवन येथे भेट घेतली. आणि घणसोली नोडमधील रस्ते, पदपथ, विजपुरवठा, मलःनिस्सारण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, डेब्रिज इत्यादीविषयी समस्यांचे सचित्र सविस्तर निवेदन श्री. गगरानी यांना सादर केले. शासकीय-निमशासकीय संस्थांशी संबंधीत घणसोली नोडमधील विविध समस्यांची निवेदने त्या-त्या संस्थांच्या पदाधिकार्यांना देखील देण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिकेशी संबंधीत समस्यां सोडविण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. वीजसमस्यांविषयीचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी-अभियंत्यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
घणसोली नोड पालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण करीत आहोत, अशी माहिती गगरानी यांनी बैठकीत आमदार नाईक यांना दिली. सिडकोच्या वतीने जी कामे घनसोली नोडमध्ये सुरु आहेत अथवा निविदा प्रक्रीयेत आहेत ती कामे पूर्ण करावीत, या कामाची गुणवत्ता चांगली असावी, जी कामे महापालिका करणार आहे, त्याचा परतावा पालिकेला मिळावा, अशा महत्वपूर्ण सुचना देखील आमदार नाईक यांनी बैठकीत गगराणी यांच्याकडे केल्या.
घणसोली नोडमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत सिडकोचे माजी व्यवस्थापकीय-संचालक संजय भाटीया यांच्या समवेत आमदार नाईक यांची सकारात्मक चर्चा झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार आमदार नाईक यांनी सिडकोच्या अधिकार्यांसमवेत घणसोली नोडचा संयुक्त पहाणीदौरा देखील केला होता. त्यानुसार घणसोली विभागात सेक्टर 8, 15,21 आणि सेक्टर 23मध्ये सिडकोने 50 कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित केली होती. मात्र अद्यापही या कामांना मंजुरी देण्यात आली नसल्याचे आमदार नाईक यांनी श्री गगराणी यांच्या निदर्शनास आणून दिले आणि ही विकासकामे तातडीने सुरु करण्याची मागणी केली. घणसोली नोडमध्ये आमदार नाईक यांनी जनसंवाद हा उपक्रम देखील आयोजित केला होता. या उपक्रमात त्यांनी या नोडमधील जनतेच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या होत्या. घणसोली नोड सिडकोकडून महापालिकेस हस्तांतरित झालेला नाही. सिडकोकडील सामाजिक सुविधांचे भुखंड देखील महापालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, समाजमंदिर, बहुउददेशीय इमारत, उद्याने अशी पायाभूत व इतर नागरी सुविधांची कामे नोडमधील जनतेसाठी महापालिकेला उपलब्ध करुन देता येत नाहीत. त्यामुळे घणसोली नोडमधील सुविधा भुखंड सिडकोने पालिकेकडे तात्काळ हस्तांतरित करावेत, जेणेकरुन या सुविधा भुखंडांच्या माध्यमातून पालिकेला घणसोलीमधील नागरिकांना सुविधा पुरविता येतील, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली. यावर सुविधा भुखंड हस्तांतरणाची प्रक्रीया गतीमान करण्यात येईल, असे आश्वासन गगराणी यांनी आमदार नाईक यांना दिले. घनसोलीत साकारणार्या वैशिष्टयपूर्ण सेंट्रल पार्कच्या प्रवेशदवारासाठी आवश्यक जागा सिडकोकडून पालिकेला देण्याबाबत आमदार नाईक यांनी मागणी केली असता याबाबत गगराणी यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
चौकट
आमदार संदीप यांनी घणसोली नोड हस्तांतरणासाठी केलेला पाठपुरावा…
2010 सालापासून सिडकोकडे पत्रव्यवहार
सिडकोचे अध्यक्ष, एम.डी. पालिका अधिकारी यांच्याबरोबर बैठकांमधून सकारात्मक चर्चा
सिडको आणि पालिकेच्या अधिकार्यांसोबत घनसोली नोडचा संयुक्त पाहणीदौरा
जनसंवाद उपक्रमातून घसोली नोडच्या समस्या जाणून घेतल्या.