नवी मुंबई / गणेश इंगवले
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार २७ डिसेंबर २०१६ रोजी सिडको भवन येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) प्रकल्पग्रस्तांसाठी १२.५ टक्के भूखंड वाटप योजने अंतर्गत संगणकीय सोडत सिडको भवन, सातवा मजला, सभागृह येथे संपन्न झाली. या प्रसंगी मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर उपस्थित होते.
गावनिहाय संपादित झालेल्या भूधारकांनी वा त्यांच्या कायदेशीर वारसांनी, त्यांची संपादित जमिनीशी संबंधित निवाडानिहाय पात्रता एकत्रिकरणाद्वारे भूखंड वाटपाकरिता संमती दिलेली आहे, अशा भूधारकांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. सदर भूधारकांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या जेएनपीटी नोडमध्ये भूखंड इरादित करण्यात आले आहेत. एकूण २५ भूखंडांसाठी काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये कमीत कमी २००० चौ.मी. क्षेत्रफळाचा तर जास्तीत जास्त १०,७४१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड इरादित करण्यात आला आहे.
एकूण २५ भूखंडांसाठी संगणकीय सरमिसळ म्हणजेच कंप्युटराईज्ड रँडमायजेशन पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. यामध्ये उपस्थित प्रकल्पग्रस्तांकडून चार अंकी चार आकडे घेऊन त्यांची सरासरी काढून बीज क्रमांक प्रणालीमध्ये फीड करून सदर संगणकीय सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी सिडकोतर्फे विशेष प्रणाली तयार करण्यात आली असून पुण्यातील नामांकीत सी-डॅक संस्थेकडून सदर प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे.
सोडतीची यादी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (रायगड), सिडको भवन, भूमी व भूमापन (साटयो), सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व व्यवस्थापक (कार्मिक व औद्योगिक संबंध), जेएनपीटी, प्रशासन भवन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट शेवा, नवी मुंबई या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://cidco.maharashtra.gov.in/ देखील सदर यादी उपलब्ध आहे.