नवी मुंबई / संजय बोरकर
ए.पी.एम.सी मार्केट आवारातील स्टॉलच्या समस्यांबाबत स्टॉल धारकांसमवेत आमदार मंदा म्हात्रे यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. मार्केटमध्ये स्टॉलधारकांना भेडसावणार्या समस्या आ. मंदा म्हात्रे यांनी पणनमंत्र्यांना सांगितल्या असता त्यांनी लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
ए.पी.एम.सी तील स्टॉल धारक हे ए.पी.एम.सी मार्केट मधील आवारातील अधिकृत व्यवसाय करणारे आहेत. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी या स्टॉल धारकांना नवी मुंबई महानगर पालिके कडून व्यवसाय परवाना घेण्याबाबतच्या नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. ए.पी.एम.सी मधील स्टॉल धारक हे अधिकृत भाडेकरू असून ते नियमितपणे भाडे भरीत असून, त्यामध्ये सर्व करांचा समावेश आहे व या स्टॉल धारकांनी ए.पी.एम.सी कडून ना हरकत छजउ घेतलेली आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता न.मु.म.पालीकेकडे केलेली असताना देखील पालिका जाणून बुजून व्यवसाय परवाना देण्यास टाळाटाळ करीत होते व सर्व स्टॉल धारकांना २४ तासांची मुदत देऊन स्टॉल सील करण्यासाठीची नोटीस बजावली होती.
या संदर्भात स्टॉल धारकांनी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट धेऊन वरील विषयाबाबत चर्चा केली. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांनी वरील स्टॉल धारकांच्या शिष्टमंडळा समवेत पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली असता मंत्री देशमुख यांनी एपीएमसीतील संबंधित स्टॉलधारकांचे पुढील दहा वर्षांकरीताचे करारनामे त्वरीत करण्याबाबतचे आदेश ए.पी.एम.सी मार्केटचे सचिव शिवाजीराव पळणीकर यांना दिले.