अनधिकृत मजला निष्काषित करून संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी
शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
मनविसेच्या शिष्टमंडळाचे मनपा अतिक्रमण विभागाला साकडे
नवी मुंबई / संजय बोरकर
मागील आठवड्यात नेरूळ येथील एमजीएम शाळेत सातवीच्या विद्यार्थीनीवर शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असताना पुन्हा एकदा या शाळेच्या तिसर्या मजल्यावरील महिलांच्या स्वछतागृहात १-२ महिन्यांचे अर्भक आढळल्याने एमजीएम शाळा प्रशासन वादाच्या भोवर्यात सापडले असतानाच तो तिसरा मजलाच अनधिकृत असल्याने ते अनधिकृत बांधकाम हटवून शाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांकडे केली आहे .
नेरूळ येथील भूखंड क्र. १३ ए या भूखंडावर एमजीएम शाळेची इमारत असून मुळात २ मजल्याची असणार्या या इमारतीत तिसर्या मजल्यावर नधिकृतपणे ९-१० वर्गखोल्या उभारण्यात आल्या असून सदर अनधिकृत बांधकाम करताना शाळा प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कोणतीही बांधकाम परवानगी घेतली नसल्याचे सविनय म्हात्रे यांचे म्हणणे आहे. ही बाब नवी मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९७५ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नूसार बेकायदेशीर असल्यामुळे सदर अतिक्रमित बांधकामाचा वापर थांबविण्यात यावा व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या१९६६ कलम ५४ नूसार सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे व एमजीएम शाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिक्रमण विभागाकडे केली आहे. यावेळी शिष्टमंडळात सविनय म्हात्रे यांच्यासमवेत मनविसेचे शहर सचिव निखिल गावडे, अजय सुपेकर, तुषार कचरे उपस्थित होते.
सिडकोने नवी मुंबईतील शैक्षणिक संस्थांना अत्यल्प दरामध्ये बांधकामासाठी भुखंड दिलेले असताना त्यांना क्रिडांगणही दिलेले आहेत. तथापि शालेय वेळेव्यतिरिक्त त्या क्रिडांगणाचा वापर स्थानिक मुलांना करण्यास द्यावा असे निर्देशी सिडकोने दिले आहेत. तथापि या एमजीएम शाळेने स्थानिक मुलांना हे क्रिडांगण अनेकदा वापरण्यास न दिल्यामुळे परिसरातील मुलांमध्ये शाळेच्या व्यवस्थापनाप्रती आजही संताप कायम आहे. काही वर्षापूर्वी कॉंग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका वैशाली तिडके यांनी स्थानिक जनतेच्या मदतीने मुलांना खेळण्याकरिता क्रिडांगणाची संरक्षक भिंतही काही ठिकाणी तोडली होती. काही दिवसापूर्वीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळेलगतच असलेल्या राजर्षी शाहू महाराज उद्यानामध्ये वॉक विथ कमिशनर हे अभियान राबविले असता, स्थानिक मुलांनी शाळा क्रिडांगणाचा वापर करू देत नसल्याची लेखी तक्रार मुंढे यांच्याकडे केली होती. मुंढे यांनी मैदानाची डागडूजी तुम्ही कराल का, असा प्रश्न स्थानिक मुलांना विचारला असता, स्थानिकांनी त्या मैदानाची देखभाल करण्याची तयारीही दर्शविली होती.
स्थानिक मुलांना क्रिडांगणाचा वापर शालेय वेळेव्यतिरिक्त करू न देण्याची शाळेची अरेरावी, अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनेच केलेला अत्याचार व आता त्यापाठोपाठ शाळेचा तिसर्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम यामुळे नेरूळ सेक्टर आठमधील एमजीएम शाळा आता चांगलीच वादाच्या भोवर्यात सापडली आहे. ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा चालविण्यास तत्परता दाखविणारी नवी मुंबई महापालिकेचा अतिक्रमण विभाग आता एमजीएम शाळेच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा कधी चालविणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहीली आहे.