नववर्षाच्या सुरूवातीची आणि सरत्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा वर्धापनदिनही १ जानेवारीला असल्याने पालिका कर्मचारी-अधिकारीही कार्यक्रमात व्यस्त असले तरी दबक्या आवाजात आयुक्त मुंढे हे येत्या १०-१२ दिवसात पदावरून जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यापासून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारकिर्द वादळीच ठरलेली आहे. राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता खुलेआमपणे राजकारण्यांना अंगावर घेत मुंढेंनी आपली कार्यप्रणाली कायम ठेवली. नवी मुंबईतील भाजपा वगळता अन्य सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका सभागृहात मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठराव मंजुर केला. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंढेंच्या पाठीशी उभे राहील्याने या अविश्वास ठरावप्रकरणी नवी मुंबईतील राजकारण्यांचे हसे झाले आहे.
राजकारणी मुंढेंच्या विरोधात असली तरी नवी मुंबईकरांच्या गळ्यातील मुंढे ताईत बनले होते. अतिक्रमण विरोधी मोहीमा मुंढे यांनी राबविल्याने अतिक्रमण करणार्यांचे धाबे दणाणले होते. मुंढेंच्या विरोधात सर्वपक्षीय राजकारण्यांनी नवी मुंबई बंदही केली होती. मार्जिनलची स्पेसमधील अतिक्रमणावर मुंढेंची करडी नजर राहील्याने अनेक पदपथ तसेच दुकानांसमोरील जागा रिकामी दिसू लागली. महापालिकेच्या अनेक खर्चिक प्रकल्पांना मुंढे यांनी कात्री लावली. मुंढे आल्यापासून स्थायी समिती सदस्यांना काजू कतरी मिळण्यात अडथळे आल्यामुळे तसेच कामे होत नसल्यामुळे नगरसेवकांचेही ‘समाधान’ न झाल्याने झक मारली आणि निवडणूक लढली अशी निराशाजनक प्रतिक्रिया नगरसेवकांकडून उघडपणे व्यक्त होवू लागली. मुंढे अजून दोन वर्षे राहीले तर आपला निवडणूक खर्चही वसूल होणार नसल्याचे नगरसेवक खासगीत बोलू लागले आहेत.
केवळ सभागृहातील नगरसेवकांनाच नाही तर महापालिकेत वर्षानुवर्षे सरंजामदार बनलेल्या अनेक वरिष्ठ पालिका अधिकार्यांनीही मुंढेंच्या कार्यप्रणालीचा धसका घेतला. अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारत मुंढेंच्या हाताखाली काम करण्यास निरूत्साह दाखविला. मालमत्ता कर विभागातील अनेक गैरप्रकार मुंढेंमुळे उघडकीस आले. मुंढेंना पाठिंबा देणार्या नवी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून मुंढेंना पाठिंबा देण्यास निरूत्साह दाखविल्यामुळेच मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठरावावर मतदान करण्याचे धाडस नगरसेवकांना दाखविता आले.
मुंढेंनी आपल्या कारवाईचा रोख प्रस्थापित मातब्बर राजकारण्यांच्या शैक्षणिक संकुलाकडे वळविल्यानेच नगरसेवकांना मुंढे विरोधाची धार तीव्र करणे शक्य झाले. शिक्षण सम्राटांनी नगरसेवकांनाच नाही तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनाही आपल्या बाजूने अनुकूल करून घेतल्याने मुंढेंच्या समर्थनार्थ अवघ्या ६ नगरसेवकांचे संख्याबळ प्राप्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंढेप्रेम जगजाहिर नसते तर कदाचित आज भाजपा नगरसेवकांचीही भूमिका वेगळी पहावयास मिळाली असते, असे अन्य नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. सभागृहात मुंढेंना समर्थन देणार्या भाजपाने सभागृहाबाहेर मुंढे समर्थनार्थ फारसे केले नाही. ती पोकळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गजानन काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी भरून काढली. गजानन काळे यांनी मुंढेंच्या समर्थनार्थ जनसामान्यांत तसेच सोशल मिडीयामध्येही प्रभावीपणे चळवळ राबविली.
वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून तुकाराम मुंढेंनी नवी मुंबईतील उद्याना उद्यानामध्ये फेरफटका मारून नवी मुंबईकरांशी जवळीक साधली. परिणामी नवी मुंबईकरांना आपल्या समस्या आयुक्तांपुढे थेट मांडणे शक्य झाले. या अभियानामुळे अधिकांश समस्यांचे निवारणही झाले. घणसोली नोडचे सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरण हा मुंढेंच्या कामातील निर्णायक टप्पा ठरला.
मुंढेंच्या कामाबाबत, स्वच्छ कारभाराबाबत नवी मुंबईकर समाधानी असले तरी मुंढे यांच्या स्वभावातील दोषामुळे त्यांच्या कामावर काही प्रमाणात काळीमा निर्माण होवू लागली. काम करणार्या मुंढेंची हेकट, रागीट, मनमानी कारभार करणारे हुकूमशहा अशीही पालिका वर्तुळात तसेच जनसामान्यांमध्ये अल्पावधीतच प्रतिमाही निर्माण झाली. महापालिका मुख्यालयात आयुक्त मुंढे यांना भेटावयास येणार्या नगरसेवकांशी तसेच अन्य नवी मुंबईकरांशी सौजन्याने, विनयशील बोलणे मुंढेना फारसे जमलेच नाही. वॉक विथ कमिशनर अभियानातही मुंढेंच्या या स्वभाव गुणाचा नवी मुंबईकरांना जवळून परिचय आला. नगरसेवकांना त्या त्या प्रभागातील नागरिकांनी निवडून दिलेले आहे. ते त्या त्या लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतात, याचे भानही मुंढेंना राहीलेले नाही. नगरसेवकच नाही तर महापौर आणि आमदारांशीही सौजन्यांने बोलण्याचे व वागण्याचे औचित्य मुंढेंना दाखविता आले नाही.
सत्तेतील मित्र पक्ष असलेला शिवसेना मुंढेंच्या विरोधात रान उठवित असताना मुंढे यांची फार काळ पाठराखण करणे भाजपाला परवडणारे नाही. माणूस काम कितीही चांगले असला तरी हेकट, रागीट स्वभावच मुंढेंना नवी मुंबईला ‘जय महाराष्ट्र’ करण्यास कारणीभूत ठरणार आहे. महापालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारीही दबक्या आवाजात मुंढेसाहेब आता १०-१५ दिवसाचेच आता पाहूणे राहीले असल्याचे सांगत आहेत. मुंढे यांची अन्यत्र बदली होणार असल्याचे मंत्रालयीन पातळीवरील सूत्रांकडूनही ठामपणे सांगण्यात येत असल्याने सभागृहातील नगरसेवक व पक्षीय पदाधिकारीदेखील २०१८ वर्ष नक्कीच चांगले जाणार असल्याचे उघडपणे आता बोलू लागले आहेत.
– साभार : दै. जनशक्ति, मुंबई आवृत्ती