ओटल्याचे भाडे कमी करा, मच्छि विक्रेत्या महिलामध्ये पालिकेप्रती नाराजी
संजय बोरकर : नवी मुंबई
गेल्या 35 ते 40 वर्षांपासून नवी मुंबईतील 2500 हून अधिक महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पारंपारिक पद्धतीने मच्छी विकून व्यवसाय करीत आहेत. महापालिकेकडून मासळी मार्केटच्या इमारतीत मासळी विक्री करणार्या सदर महिलांना ओटले देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला खरा; पण महापालिकेने या मासळी विक्रेत्या महिलांना ओटला देण्यासंदर्भात दरमहा 2200 रुपये भाडे आकारणी करणार आहे. त्यामुळे सदर मच्छी विक्रेत्या महिलांमध्ये महापालिकेविरोधात नाराजी असून त्याअनुषंगाने त्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांना साकडे घालून त्यांना मागणीचे पत्र दिले.
महापालिका आकारणार असलेले भाडे जास्त असून ती रक्कम या मासळी विव्रेत्या महिला भरू शकत नाहीत. मासळी विकून येणार्या उत्पन्नापेक्षा सदरची रक्कम महापालिकेला भाड्यापोटी भरावी लागणार असल्याने या महिलांवर आर्थिक संकट ओढवण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने करावे गाव येथील 40-45 मासळी विक्रेत्या महिलांनी त्यांची व्यथा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमोर मांडताना त्यांना महापालिकेच्या सदर निर्णयाबाबत माहिती दिली. यानंतर आ. मंदाताई म्हात्रे यांनी 30 डिसेंबर रोजी सदर महिलांसमवेत महापौर सुधाकर सोनवणे यांची महापालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. विशेष म्हणजे सदरचा निर्णय 26 ऑगस्ट 2014 रोजी महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र. 840 आणि 28 सप्टेंबर 2016 रोजी स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. पण, मासळी विक्रेत्या महिलांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन भाडे करार होण्याआधी मासळी विक्री करणार्या महिलांना ओटल्याचे कमीतकमी भाडे आकारणी करून अनामत रक्कम माफ करण्यात यावी. त्यासाठी नव्याने ठराव तयार करून महासभेमध्ये मंजुरीकरिता आणावा, अशी मागणी आ. मंदाताई म्हात्रे यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांच्याकडे केली. त्यावर मच्छीमारांना ओटले देण्याच्या भाडे संदर्भात महापालिका सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीने जो ठराव मंजूर केला त्याचा पुनर्विचार करण्यात येईल. त्याअनुषंगाने येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदर विषयावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर सुधाकर सोनवणे यांनी यावेळी दिले. तर जर मच्छीमारांच्या ओटले आणि मच्छी मार्केटचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यासाठी आमदार निधी देण्याची ग्वाही आ. मंदाताई म्हात्रे यांनी महापौरांना दिली.