नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतील भाजपाचे बेलापूर-शहाबाज प्रभाग क्रमांक 107 चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य दिपक पवार अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. नगरसेवक दिपक पवार यांच्यावर अनधिकृत बांधकामांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटिस बजावली आहे. त्यानुसार नगरसेवक पवार यांना येत्या 5 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजता स्पष्टीकरण देण्यासाठी आयुक्तांच्या दालनात सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे.
सीबीडी-बेलापूर विभागातील शहाबाज गाव येथे आर्यन इंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून मातोश्री अपार्टमेंट नामक चार मजली अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. नगरसेवक दिपक पवार आर्यन इंटरप्रायजेसचे मालक आहेत. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामांशी नगरसेवक पवार यांचा संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पवार यांना यापूर्वी बेलापूर विभाग अधिकार्यांनी नोटिस बजावली होती. पण, यानंतर महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे संचू मेनन यांनी 3 मे 2016 रोजी त्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गत 8 जुलै 2016 रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी यासंबंधी अहवाल तयार करुन तो आयुक्तांकडे सादर केला होता. यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने 25 ऑक्टोबर रोजी आदेश काढले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवक दिपक पवार यांना नोटिस बजावून येत्या 5 जानेवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकाम प्रकरणी आणखी शिवसेना, भाजपासह राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिका आयुक्तांच्या रडारवर असून त्यांनाही महापालिका लवकरच नोटिस बजावण्याची शक्यता आहे. तर नुकतीच अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना नगरसेवक बहादूर बिस्ट यांची महापालिका आयुक्तांसमोर सुनावणी झाली असून त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे.