नवी मुंबई: २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज समारंभपूर्वक प्रदान केला होता. तेव्हापासून २ जानेवारी दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझींग डे साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलीस दलाच्या रेझींग डे निमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने येत्या २ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानांतर्गत अभिनेता संतोष जुवेकर आणि समाजसेवक डॉ. अजित मगदूम मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कोपरखैरणेतील डी-मार्ट जवळ पोलीस बॅन्डचे सादरीकरण होणार आहे. ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वाशीतील सेंटर वन मॉल येथे महिला सुरक्षा-वाहतुकीच्या नियमांचे पालन या विषयावर पथनाट्य सादर केले जाणार असून सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सीबीडी सेक्टर- ४/६ च्या मार्केट येथे पोलीस बॅन्डचे सादरीकरण होईल.
४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत फिर्यादींना जप्त मुद्देमालाचे वाटप तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खारघरमधील उत्सव चौकात पोलीस बॅन्डचे सादरीकरण होणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महिलाबालकांचे हक्क संरक्षणाचे कायदे-महत्वाचे न्याय निर्णय या विषयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर, आमदार निलम गोर्हे, आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत नेरुळ येथे पोलीस बॅन्डचे सादरीकरण होणार आहे.
विशेष म्हणजे सदर चारही दिवसात विविध शाळांतील विद्यार्थी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेणार आहेत.
दरम्यान, सदर जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.