मागील वर्षी ठराव संमत पण अंमलबजावणी आता
२००० पर्यतच्या झोपड्यांना आता पाणीपुरवठा
आतापर्यत १,८८३ झोपडपट्टीधारकांना मिळाला लाभ
१०७५० बेकायदा नळजोडण्या आजपर्यत खंडीत
मोरबे धरणातही मुबलक पाणीसाठा
नवी मुंबई : २०१७ वर्ष नवी मुंबईकरांना चांगलेच जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आयुक्तपदावरून मुंढे जाणार असल्याचे निश्चित झाल्याने उरलेल्या साडे तीन वर्षात निवडणूकीचा खर्च काढून पुढच्या निवडणूकीची तरतूद होण्याचा आशावाद नगरसेवकांकडून आता उघडपणे बोलला जावू लागला आहे. त्यातच मोरबे धरणात असलेला मुबलक साठा पाहून २००० पर्यतच्या झोपडपट्टीधारकांना पाणी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त मुंढेंनी घेतल्याने त्यांनाही आता पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. या निर्णय वर्षभरापूर्वीच महासभेने घेतला असला तरी कमी पडलेला पाऊस व मोरबेत असलेला कमी पाण्याचा साठा यामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले नव्हते.
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नुकताच घेतल्याने नवी मुंबई मधील झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या झोपड्यांना पाणी देण्याच्या निर्णयाचा अद्यापर्यंत १ हजार ८८३ झोपडपट्टीवासियांनी घेतला आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.
२०१५ साली महापालिका महासभेत २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, २०१५ साली पुरेसा पाऊस न पडल्याने २०१५ या वर्षात महापालिकेला पाणी कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे २०१५ मध्ये २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा ठराव मंजूर झाला, तरी त्या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले नाही. मे-२०१६ मध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टी वसाहतीसह नोड आणि गावठाण भागातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याचे आदेश दिले होते. यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. २०१५ यावर्षी पाऊस कमी पडल्याने महापालिका प्रशासनाने काही प्रमाणात पाणी कपात केली तरी अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई करण्याची हिंमत केली नव्हती. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा नळजोडण्या दिसल्या तर अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने अद्यापपर्यंत १० हजार ७५० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने पाणी चोरी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली.
अनधिकृत नळजोडण्या खंडित करतांना नागरिकांना अधिकृत नळजोडणी घेण्याचे आवाहनही महापालिका प्रशासनाक्षरे करण्यात आले होते. दरम्यान, २०१६ या वर्षी चांगला पाऊस पडल्याने महापालिकेच्या मोरबे धरणातही चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई शहरातील २००० सालापर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासह महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोपडपट्टीवासियांना नळजोडणी घेताना लागणार्या कागदपत्रांची संख्या देखील कमी करुन नळजोडणी प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. यामुळे कागपत्रद जमवाजमव करण्यासाठी नागरिकांना होणारा मनस्ताप वाचला आहे. या कारणास्तव नागरिकांकडूनही नळजोडणी घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिघा- ६३६,ऐरोली -४११, घणसोली- ३६२, तुर्भे-४१४ अशा सुमारे १ हजार ८८३ झोपडपट्टीवासियांनी अधिकृत नळजोडणी अद्यापपर्यंत घेतली आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.
नळजोडण्या खंडीत झाल्याचा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणारा दावा फसवा असल्याची टीका नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. आजही शहरी भागाच्या तुलनेत गावठाणात मोठ्या संख्येने अनधिकृत नळजोडण्या आहेत. अनधिकृत नळजोडण्या हा केवळ फोटोसेशनकरीता व कागदोपत्री दाखविण्याकरीताच खंडीत झाल्या आहेत. खंडीत नळजोडण्या हा कारवाई झाल्यानंतर पाणीचोरांना अवघ्या अर्ध्या तासातच पुन्हा चालू केल्या असल्याचे जागोजागी पहावयास मिळत आहे. अनधिकृत नळजोडण्यांवर खरोखरीच पालिका प्रशासनाने कारवाई केल्यास नवी मुंबईकरांना कधीही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. तथापि महापालिका विभाग कार्यालय अखत्यारीत असणार्या पाणीपुरवठा कर्मचारी व अधिकार्यांच्या आर्शिवादाने गावठाणात आजही अनधिकृत नळजोडण्यांतून पाणीचोरी सुरूच आहे.
साभार :- दै. ‘जनशक्ती’