ऐतिहासिक युग असो वा कलियुग. कोणत्याही युगातील चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूचा मृत्यू हा अटळच असतो. नवी मुंबई महापालिका प्रशासकीय राजकारणात तुकाराम मुंढे हे नाव एव्हाना महापालिकेतील कायम अधिकारी व कर्मचारी, कंत्राटी कामगार, कामगार संघटना, सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवक यांच्यापुरतेच सिमित राहीलेले नसून ते दिघा ते बेलापुरदरम्यान विखुरलेल्या नवी मुंबई कार्यक्षेत्रातील प्रत्येकालाच परिचित असे झालेले आहे. तुकाराम मुंढे हे तसे महाराष्ट्रातील परिचित आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. ते ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी तेथील प्रस्थापित राजकारण्यांशी त्यांचा पंगा हा हमखास ठरलेला असतो. ते सेवेत रूजू झाल्यापासून ते ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणचे प्रस्थापित राजकारणी आपल्या घरातील देव मुंढे यांची या ठिकाणाहून लवकरात लवकर बदली व्हावी याकरिता देव पाण्यात ठेवून असतात. नवी मुंबईदेखील त्याला अपवाद राहीलेली नाही. नवी मुंबईत आल्यापासून मुंढे यांची कामाची शैलॅी, निर्णय व राजकारण्यांना अंगावर घेण्याचे धाडस पाहिल्यावर एक दिन का सीएमच नवी मुंबईत आला असल्याचा भास नवी मुंबईकरांना झाला. मुंढे आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले अशाच थाटात ते पहिल्या दिवसापासून वावरत असल्याचे मुंढे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची कोणत्याही क्षणी बदली होणार असल्याचे आता स्पष्ट झाल्याने मुंढे समर्थकांकडून लवकरच दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झालेली आहे. मुंढे नावाचा सिनेमा आता लवकरच संपणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चित्रपटात खलनायक हा पावणे तीन तास गोंधळ घालतो, पण शेवटच्या १५ मिनिटामध्ये खलनायकाचा अंत हा ठरलेला असतो असे आता मुंढे विरोधकांकडून उघडपणे बोलले जावू लागले आहे. मुंढे आयुक्तपदावरून जाणार असल्याची चर्चा होवू लागल्याने मुंढे समर्थकांच्या चेहर्यावर सुतकी अवकळा पसरली आहे. तुकाराम मुंढेरूपी अभिमन्यूचा राजकारणातील कौरवांनी मंत्रालयीन सहकार्यातून चक्रव्यूहातच बळी घेतला असल्याची निराशाजनक प्रतिक्रिया मुंढेसमर्थकांकडून व्यक्त केली जावू लागली आहे.
तुकाराम मुंढे यांचे महापालिका आयुक्त म्हणून पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहीलेले आहे. कामावर रूजू झाल्यावर त्यांनी आपण महापौरांच्या कार्यालयात आपण त्यांना भेटावयास जाणार नाही अशी ताठर भूमिका घेतली. मुंढे यांच्या कामाबाबत कोणीही नाराज नाही, अगदी मुंढे विरोधकही नाहीत. मुंढे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी आपल्या कालावधीत कोठेही एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. ना स्वत: खाणार आणि कोणालाही खाऊ देणार नाही ही मुंढे यांची कार्यप्रणाली नवी मुंबईकरांच्या आवडीची बनली आहे. आजवरच्या नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी महापालिका मुख्यालयातील वातानुकूलित कार्यालयात बसूनच नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार हाकला. पण मुंढे त्याला अपवाद ठरले. त्यांनी वाक विथ कमिशनर अभियान राबविताना थेट नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधला. मुंढे यांच्या कामाची पध्दती पाहिल्यावर हा माणूस भ्रष्टाचार करणारा नाही आणि कोणालाही करू देणार नाही याची महापालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना आली. उलटपक्षी आजवर नवी मुंबई महापालिकेत आजवर ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांनाही पोलीस कोठडीत टाकण्यास हा माणूस मागेपुढे पाहणार नाही याची प्रचिती आल्यामुळे काही महापालिका अधिकार्यांनी स्वेच्छा निवृत्तीही घेतली.
अतिक्रमणावर हातोडा टाकण्यास मुंढेंनी राजकीय दबावाला खतपाणी न घातल्याने ते राजकारण्यांच्या रडारवर आले. मुंढे राजकारण्यांपुढे झुकत नसल्याने मुंढे विरोधकांनी नवी मुंबई बंदचाही प्रयोग केला. अखेरिला महापालिका सभागृहात मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूरही करवून घेतला. तथापि मंत्रालयीन पातळीवर असणारे देवेंद्र तुकारामांच्या पाठीशी असल्याने या अविश्वास ठरावाला काही काळ केराची टोपली मंत्रालयीन पातळीवरून दाखविण्यात आली. शिवसेना कंबर कसून मुंढेच्या बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र नवी मुंबईत निर्माण झाले आहे. सत्तेत मित्र पक्ष असणार्या शिवसेनेची नाराजी मुंढे प्रकरणावरून ताणणे भाजपाकरीताही सुज्ञपणाचे ठरणार नसल्याने मुंढे यांना आयुक्तपदावरून हटविण्याचे अखेरिला मंत्रालयाने निश्चित केले आहे.
मुंढे त्यांच्या कार्यशैलीमुळे नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनले असले तरी त्यांच्यातील स्वभाव गुणामुळे ते टीकेचे धनीही बनले. अत्यंत हेकट स्वभाव, इतरांना तुसडेपणाने वागविण्याची मनोवृत्ती, मनमानी वागणे, इतरांना आदर देण्याचे सौजन्य नाही, भेटायला आलेल्यांशी सौजन्यांने न वागणे यामुळे मुंढे यांच्या कार्यप्रणालीला ग्रहण लागले. मुंढे यांच्या अवगुणांशी नवी मुंबईकरांना काहीही देणेघेणे नव्हते. त्यांना काम करणारे, अतिक्रमण हटविणारे, राजकारण्यांना अंगावर घेणारेच मुंढे आजही हवे आहेत. मुंढेंच्या पाठीशी आजही त्यांचे समर्थन कायम आहे. मुंढे आयुक्तपदावरून जाणार निश्चित झाल्याने नवी मुंबईच्या कुरूक्षेत्रात या कलियुगातील अभिमन्यू मारला जाणार हेही अधोरेखित झाले आहे. मूहूर्त कोणत्याही क्षणी निघू शकतो.
संदीप खांडगेपाटील /८०८२०९७७७५
साभार :- दै. ‘जनशक्ती’
संदीप खांडगेपाटील यांचा दै. जनशक्तीमध्ये प्रकाशित झालेला लेख नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रकाशित करत आहोत. १९९२ पासून संदीप खांडगेपाटील पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. राजकीय क्षेत्रातील लिखाणांवर त्यांचा प्रभाव असून सध्या ते दै. जनशक्तीमध्ये वृत्तसंपादक म्हणून काम करत आहेत.