नवी मुंबई / संजय बोरकर
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत पुरक शैक्षणिक मार्गदर्शके व सराव प्रश्नपत्रिका संचाचे वाटप नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय घणसोली येथे इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पुरक शैक्षणिक मार्गदर्शक साहित्य व हिंदी आणि उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांना पुरक शैक्षणिक मार्गदर्शक साहित्यासह सराव प्रश्नपत्रिका संचाचे वाटप दिनांक 21/12/2016 रोजी करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे आणि नवनीत प्रकाशनचे प्रतिनिधी जे.मिस्त्री उपस्थित होते.
शालेय जीवनात पहिली प्रमाणित प्ररीक्षा म्हणजे इयत्ता 10वीच्या बोर्डाची परीक्षा होय म्हणून हया परीक्षेला विद्यार्थ्यांच्या जीवनात विशेष महत्व असते. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. पाठयपुस्तके ही अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असून त्यांचा अभ्यास झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरुप विद्यार्थ्यांनी समजुन घ्यावे. पाठयपुस्तकांचे वाचन झाल्यावर उत्तरे कशी लिहावीत यासाठी मार्गदर्शक म्हणून या पुरक शैक्षणिक मार्गदर्शक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना सांगितले.
परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रथम प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घ्यावा. प्रश्नांची उत्तरे लिहीण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचे वाचन करावे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तर लिहतांना काय समजले ते लिहण्यापेक्षा प्रश्नात नेमके काय विचारले आहे तेच लिहावे. अचूक नेमके, शब्दात व सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहावीत. एखादया विषयातील घटकाचे वाचन केल्यास आपणास माहिती मिळते आणि ही माहिती जर समजून घेतली तर आपणास ज्ञान मिळते व हे ज्ञान आपल्याकडे कायम राहते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा असे उपयुक्त मार्गदर्शन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेकरीता उज्ज्वल भवितव्याकरिता शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने डी मार्ट व नवनीत प्रकाशन यांच्या सी.एस.आर.च्या संयुक्त माध्यमातुन मराठी माध्यमातील 1810, हिंदी माध्यमातील 353 व उर्दु माध्यमातील 85 असे एकूण 2248 विद्यार्थ्यांना रु.10,60,195/- किमतीच्या पुरक शैक्षणिक साहित्य व प्रश्नसंचांचे वाटप करण्यात आले.