नवी मुंबई / संजय बोरकर
नवी मुंबई हे सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जात असून पर्यावरणशील इको सिटी म्हणून नावारुपाला येत आहे. नवी मुंबईच्या सौंदर्यासोबतच इथले वेगळेपण टिपण्यासाठी व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांचे कॅमेरे क्लिक होताना दिसतात. अशा छायाचित्रकारांच्या छायाचित्रण केलेला दाद देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रतिमा – नवी मुंबईची’ या अभिनव छायाचित्रण स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेकरीता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांच्या नजरेतून सर्वोत्तम (Best of Navi Mumbai) पाच छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे अनुसरुन व्यावसायिक गटात 15 तसेच हौशी गटात 29छायाचित्रकारांनी स्पर्धा सहभाग नोंदविला. पारदर्शक पध्दतीने स्पर्धा परीक्षण होण्याकरीता स्पर्धेकरिता प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करताना परीक्षकांना कोणत्याही स्पर्धकाचे नाव कळू न देता फक्त छायाचित्रामागे लिहिलेले स्पर्धकांचे अर्ज क्रमांक प्रदर्शित करण्यात आले होते. प्रसिध्द छायाचित्रकार श्री. रणजित काकडे आणि श्री. अपूर्व सालकडे या छायाचित्रण क्षेत्रातील मान्यवर छायाचित्रकारांनी परीक्षण केलेल्या या स्पर्धेमध्ये व्यावसायिक गटात श्री.सत्यवान वास्कर, श्री. योगेश म्हात्रे, श्री.बच्चन कुमार, श्री.सुमित रेणोसे,श्री.नरेंद्र वास्कर, श्री.सुजित म्हात्रे, श्री.संदेश रेणोसे, श्री.नितीन किटुकले या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे म्हणून निवड करण्यात आली. त्यांस प्रत्येकी रु.20 हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतीचिन्हांसह प्रदान करण्यात येतील. हौशी गटात श्री.सुबोध भोईर, श्री.संजय शिंदे, कु,पलक म्हात्रे, श्री.अजर नाईक या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे म्हणून निवड करण्यात आली. त्यांस प्रत्येकी रु.10 हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेतील छायाचित्रकारांच्या नावाची सूची गुणानुक्रमे नसून व्यावसायिक गटातून सर्वोत्कृष्ट 8 तसेच हौशी गटातून सर्वोत्कृष्ट 4 छायाचित्रे निवडण्यात आलेली आहेत. ही व्यावसायिक व हौशी या दोन गटात निवडण्यात आलेली एकूण 12छायाचित्रे स्पर्धेसाठी प्राप्त छायाचित्रांमध्ये परीक्षणानुसार सर्वोत्कृष्ट आहेत, त्यामध्ये गुणानुक्रम नाही याची नोंद घेण्यात यावी.या निवडक छायाचित्रांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिका दिनदर्शिका 2017 मध्ये केला जाणार आहे.