नवी मुंबई / संजय बोरकर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामविरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहिमा राबविल्या जात असून आज नेरूळ विभागात धडक कारवाई करण्यात आली.
नेरूळगाव सेक्टर 20 येथील महादेव म्हात्रे यांच्या अनधिकृत पाच मजली इमारतीवर अतिक्रमण विभागाने निष्कासनाची धडक कारवाई करीत काँक्रिट क्रशर मशीनव्दारे ही इमारत निष्कासित केली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, नेरूळ विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. संध्या अंबादेआणि विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कामगार आणि स्थानिक पोलीस विभागाच्या मोठ्या बंदोबस्तात ही धडक कारवाई पार पडली. या कारवाईत जेसीबी, पोकलन, 2 पिकअप व्हॅन आदी सामुग्री वापरण्यात आली.
त्याचप्रमाणे नेरूळ विभागातील से.16 मधील 1, से.18 मधील 2 तसेच से.24 मधील 1 अशी अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात येत आहे.