मुंबई : मुंबई वाचवायची असेल तर शिवसेनाच हवी आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आली पाहिजे आणि येणारच असे प्रतिपादन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी चाचा नेहरू क्रीडांगण आणि मॉ साहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण लोकर्पण सोहळयात ठाकरे बोलत होते.
मालाड येथील ‘चाचा नेहरु क्रीडांगण’ व गोरेगांव (पूर्व) येथील ‘स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण’ यांचा लोकार्पण महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळ पडला होता मात्र मुंबईला पाण्याची कमतरता भासली नाही. महापालिकेलाच हे सर्व श्रेय जाते. महापालिकेतील सध्याचे पदाधिकारी व अधिकारी उत्तमपणे काम करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. मुंबई महानगरातील मोकळ्या जागा आणि मैदाने ही नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांचा शीण घालविण्यासाठी साकारलेली आहेत. ही सर्व मैदाने, क्रीडांगणे, उद्याने उत्कृष्ट असल्याचे सांगून पालिकेचे कोतुक केले.
महापौर आंबेकर म्हणाल्या की, वेगवान लोकलप्रमाणेच मुंबईकरांचे धावपळीचे जीवन सुरु असते. त्यांना विसावा आणि विरंगुळा मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षात पालिकेने ७१९ उद्याने व क्रीडांगणे साकारली आहेत. तसेच काही थीम पार्कही साकारले असून ही थीम पार्क मुंबईकरांसाठी आणि बाहेरगांवाहून येणाऱया पर्यटकांसाठी हक्काची पर्यटन स्थळे झाली आहे. महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या क्रिडागणात लहान मुलांसाठी स्केटींग, खुली व्यायामशाळा, लहान मुलांकरीता खेळणी, हॅण्डबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, उंचउडी खेळपट्टी, क्रिकेट खेळपट्टी, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, धावपट्टी, शोभीवंत जाळी, संरक्षक भिंत या गोष्टी लहान मुलांना खेळण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या क्रीडागणासाठी सुमारे ४ कोटी ८१ लाख रुपये खर्च आला. लोकार्पणानंतर चाचा नेहरु क्रीडांगण नागरिकांसाठी खुले करण्यात आले.यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तिकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, कार्यक्रमाचे संयुक्त अध्यक्ष स्थानिक नगरसेवक दीपक पवार आणि नगरसेविका अनघा म्हात्रे आणि इतर नगरसेवक यावेळी उपस्थित होते.