उत्साही कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली.
पुणे : नोटाबंदीला ५० दिवस झाल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवार) राज्यभरात आंदोलन केले. परंतु या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गल्लत झाल्याचे दिसून आले. मावळ येथील आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा देण्याऐवजी मोदी सरकारच्या कौतुकाच्याच घोषणा दिल्या. परंतु यामुळे तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या या घोषणांमुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. मोर्च्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क ‘अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा केली.
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने राज्यभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अजब प्रकार पाहायला मिळाला. चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यांच्या मागोमाग कार्यकर्ते घोषणा देत होते. परंतु वाघ यांनी ‘अब की बार’ म्हणताच कार्यकर्ते मोदी सरकार म्हणू लागल्याने एकच खळबळ उडाली. वास्तविक ‘अब की बार फेकू सरकार’ अशी घोषणा द्यायची होती. परंतु उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र ‘अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली. परंतु चित्रा वाघ यांनी लगेच बाजू सांभाळत ‘अब की बार फेकू सरकार’ असे म्हणत आवाज वाढवला व कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी १२.३० ते १ च्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. परंतु, झाल्या प्रकाराने मात्र राष्ट्रवादी नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.
दरम्यान राष्ट्रवादीने राज्यभरात आज नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारले होते. सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात रास्ता रोको करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सहभागी झाले होते. अजित पवार यांनी या वेळी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.